वरणगाव शहरात अवैध धंदेवाईकांवर कारवाईचा बडगा

0

वरणगाव। नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी वरणगाव हद्दीतील अवैध धंद्यांवर धडक कार्यवाही सुरू ठेवली असून महिलांच्या मागणीनुसार अनेक दारु भट्ट्या उध्दवस्त केल्या आहे. यामुळे अनेक बिघडणारे संसार पूर्वपदावर येण्याच्या मार्गावर आहे. सट्टा, जुगार यावर सुध्दा सहाय्यक पोलिस निरिक्षक जगदीश परदेशी यांनी आपली कडकनजर ठेवून हे धंदे बंद केले आहे.

बेशिस्त वाहतुकीची समस्या सुटली
शहर व परिसरात अवैध धंदे बोकाळले होते. महिनाभरातच यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात आली आहे. वरणगाव शहराला 27 खेडे जोडलेले असल्याने छोटीशी बाजारपेठ शहरात तयार झाली आहे. यामुळे ग्रामीण भागातून शहरात येणार्‍यांची संख्या देखील मोठी आहे. शहराला बस थांबविण्यासाठी बसस्थानक नाही. महामार्गाच्या कडेला एका बाजुला बस थांबतात. त्यामुळे वाहतुकीची समस्या देखील होती.

वाहनधारकांवर कारवाई
रस्त्याच्या बाजुला रिक्षा चालक बेशिस्तीने रिक्षा थांबवितात. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. या रिक्षा चालकांना शिस्तीत वाहने लावण्याच्या सुचना देत काहींवर दंडात्मक कार्यवाही देखील सहाय्यक पोलीस निरीक्षक परदेशी यांनी केल्यामुळे हि समस्या सुटली आहे.

अल्पवयीन चालकांवर कारवाई
शहरातील मुख्य रस्त्यावर बसस्थानक, विद्यालय, महाविद्यालय, रेल्वेस्थानक असल्याने या ठिकाणी वाहनांची मोठी वर्दळ असते. तसेच काही रोडरोमीओ फॅन्सी नंबरप्लेट लावून भरधाव वाहन चालवित असतात. सदरच्या रोडरोमीओंवर देखील कटाक्ष ठेवून पोलीस प्रशासनातर्फेे दंडात्मक कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच अल्पवयीन मुला मलींना वाहने देवू नका असा सज्जड दम पालकांना देण्यात आला आहे.