वरणगाव शहरात पाण्यासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा

जळगाव जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार : पाणी प्रश्न न सुटण्यास तीव्र जनआंदोलनाचा इशारा

वरणगाव : शहरातील पाणी प्रश्न अधिक बिकट चालल्यानंतरही प्रशासक व प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी पत्रकान्वये केला आहे. नजीकच्या फुलगावबाबत पाण्यासाठी प्रांताधिकारी तथा प्रशासक आपल्या दालनात जिल्हाधिकार्‍यांची बैठक बोलावतात मात्र वरणगावबाबत दुजाभाव का? असा प्रश्न काळे यांनी उपस्थित करीत या संदर्भात जळगाव जिल्हाधिकारी प्रशासनाकडे तक्रार शिष्टमंडळाच्या उपस्थितीत निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.

शासनाकडून वरणगावकरांची खिल्ली
वरणगाव शहरात दहा ते बारा दिवसांनी पिण्याचे पाणी येत असल्याने जनता व महिला पाण्यासाठी रस्त्यावर उतरून मोर्चे काढत आहेत शिवाय आंदोलनेही करीत आहेत मात्र प्रशासक वरणगावच्या पाणी प्रश्नावर चकार शब्ददेखील काढत नाही ही शोकांतिका आहे. पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन होत आहे मात्र प्रशासन गंभीर नसल्याने ही एकप्रकारे वरणगावकरांची खिल्ली उडवली जात असल्याचेही काळे यांचा आरोप आहे.

योजनेला गती देण्याची मागणी
भाजपा सरकारच्या काळात मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम जलद गतीने व्हावे व दहा ते बारा दिवसांनी होणारा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांच्या दालनात बैठक घ्यावी व समस्या सोडवावी अन्यथा नगरपरीषदेसमोर उपोषण छेडण्याचा इशारा जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर माजी नगराध्यक्ष सुनील काळे, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, भाजयुमो शहराध्यक्ष आकाश निमकर, महिला मोर्चा शहराध्यक्षा प्रणिता पाटील-चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड.ए.जी.जंजाळे, उपनगराध्यक्ष शेख अशलाक, नगरसेविका माला मेढे, रुख्मिणी काळे, मिलिंद भैसे, गोलू राणे, नटराज चौधरी, योगेश माळी, हितेश चौधरी, डी.के.खाटीक, साबीर कुरेशी, डॉ.सादिक शामराव धनगर, माजी सरपंच सुभाष धनगर, संदीप माळी, कृष्णा माळी, इरफान पिंजारी आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.