वरणगाव-सिध्देश्‍वरनगरचा रस्ता हरवला खड्ड्यात

0

वरणगाव । नुकत्याच झालेल्या पावसाच्या पाण्यामुळे शहरातील रॉकेल डेपोपासून ते सिध्देश्‍वरनगरापर्यंत जाणार्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने व गटारीचे सांडपाण्यामुळे रस्त्यावर ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ अभियान आपसूक राबविले तर जात नाही ना? असा प्रश्‍न सिध्देश्‍वरनगरातील नागरीक उपस्थित करीत आहे. यामुळे वाहनधारकांना आपला जीव मुठीत घेऊन येथून वाहने चालवावी लागत आहे. पालिका प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्षामुळे सर्वसामान्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मुतारी बांधण्याची मागणी
वरणगाव शहराचा वाढीव भाग असलेल्या सिध्देश्‍वरनगरकडे जाणार्या रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रस्ता हरवलाय खड्ड्यात शासन मात्र आंधळ्यांची भूमिका घेत असल्याने ग्रामस्थ, विद्यार्थी व वाहनधारक त्रस्त झाले आहेत. पावसामुळे अनेक ठिकाणी खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे विधानसभेत निवडून आले होते. त्यावेळेस आमदार सावकारे यांनी त्यांच्या निधी मंजूर करून महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालपासून ते सिध्देश्‍वरनगर व विल्हाळापर्यंत डांबरीकरण करण्यात आले होते. आज रोजी या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. वरणगाव ते विल्हाळा या रस्त्याने शेतकर्‍यांची शेती असल्याने केळी वाहतुकीसाठी ट्रॅक्टर, ट्रक व बैलगाडी अशा वाहनांचा वापर जास्त होतो. या अवजड वाहनांमुळे रस्त्यावर खड्डे पडले आहेत. खड्डे चुकविण्याच्या अंदाजात अनेकदा लहान-मोठे अपघात झाले आहेत. सिध्देश्‍वरनगरातील लोकवस्ती दिवसेंदिवस वाढत आहे परंतू येथील नागरीक समस्यांनी त्रस्त झाले आहे. जागरूक लोकप्रतिनिधींनी रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यावे, असा सूर ग्रामस्थांमधून उमटत आहे. सिध्देश्‍वरनगरातील लोकवस्ती दिवसेंदिवस वाढत असल्याने या भागात नगर पालिकेच्या माध्यमातून पुरुषाची मुतारी बांधण्यात आली होती मात्र मुतारीपासून गटार बांधकाम करणार असल्याच्या कारणावरून नगर परिषद प्रशासनाने मुतारी पाडल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. मुतारी नसल्यामुळे लघुशंकेला बसण्याची पंचायत होत आहे. त्वरीत मुतारी बांधण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.