वरणगाव स्टेट बँक चोरी प्रकरणी दोन आरोपी गजाआड

( पाच महिन्यानंतर पोलीसांना आले यश, इतर गुन्ह्याचांही होणार उलगडा )

*वरणगांव । प्रतिनिधी*

 

वरणगाव फॅक्टरी मधील स्टेट बँक ऑफ इंडिया या शाखेत पाच महिन्यापूर्वी झालेल्या चोरी प्रकरणी वरणगांव पोलिसांनी धागेदारे पसरवित दोन आरोपींना अटक केली आहे . या दोन्ही आरोपींताकडून इतर गुन्ह्याचाही उलगडा होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे पोलीसांनी सांगीतले . यामुळे वरणगांव परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे .

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि .२३ मे २०२३ च्या मध्यरात्री वरणगांव फॅक्टरीतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतील भिंतीला भगदाड पाडून चोरी केल्याची घटना दि. २४ रोजी सकाळी उघडकीस आली होती . यामुळे बँकेचे सेवा व्यवस्थापक मनिष रामवतार शर्मा यांनी वरणगांव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे . त्यानुसार वरणगाव पोलीसांनी सपोनि आशिषकुमार आडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि परशुराम दळवी, किशोर पाटील, इस्माईल शेख, योगेश पाटील, नावेद अली सैय्यद यांनी बँकेतील सीसीटीव्ही कॅमेरे व गुप्त माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली . यामुळे पाच महीन्या पासुन फरार असलेल्या वरणगांव लगतच्याच पिंपळगांव बुद्रुक येथील शुभम सुनिल तळेले ( वय – २२ ), वैभव साहेबराव पाटील ( वय – २८ ) या दोघांना बुधवारी सकाळी आपल्या ताब्यात घेवुन सखोल चौकशी केली असता त्यांनी वरील गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे पोलीसांनी सांगीतले.

 

*गंभीर स्वरूपाचे गुन्हे होणार उघड ?*

 

वरणगांव पोलीसांनी अटक केलेल्या दोन्ही आरोपींताकडून वरणगांव परिसरासह इतर भागात घडलेल्या चोरी व इतर गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांचा उलगडा होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही . यामध्ये मागील वर्षात एकाच रात्री झालेल्या पिंपळगाव खुर्द, वझरखेडे व तळवेल येथील चोरींच्या घटनांचाही उलगडा होवु शकतो अशी माहिती पोलिसांनी पत्रकारांकडे वर्तविली आहे .तर सदरहु दोन्ही सराईत गुन्हेगार पिंपळगांव बुद्रुक येथील असल्याने वरणगांव व परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे .