पुणे-मागील वर्षी पुणे पोलिसांनी भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात नक्षलवाद्यांशी संबंध असल्याप्रकरणी अटक केलेल्या वरवरा राव व अॅड. सुरेंद्र गडलिंग यांची रवानगी पुन्हा एकदा येरवडा कारागृहात करण्यात आली. चौकशीसाठी या दोघांनाही गडचिरोली पोलिसांना कधीही ताब्यात घेता येणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यात २०१६ मध्ये सूरजगड डोंगरावर माओवाद्यांनी ८० वाहने जाळली होती. यामध्ये जहाल माओवादी नेता नर्मदक्कासह मृत कमांडर साईनाथचाही सहभाग होता. पोलिसांकडून या प्रकरणात वरिष्ठ नेत्याच्या भूमिकेची चौकशी सुरू होती.
पोलिसांना सापडलेल्या काही हार्ड डिस्कसह कागदपत्रांवरून गडचिरोली पोलिसांनी सूरजगडच्या जाळपोळ प्रकरणात प्रा. वरवरा राव आणि सुरेंद्र गडलिंग या दोघांविरुद्ध अहेरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले होते. ३१ जानेवारीला गडचिरोली पोलिसांनी या दोघांना पुणे कारागृहातून ताब्यात घेतले होते. या दोघांना अहेरीच्या न्यायालयाने ११ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. सोमवारी पोलीस कोठडीचा कालावधी संपल्याने त्यांना पुन्हा अहेरी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानंतर या दोघांना पुन्हा पुणे पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले. या दोघांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली.