भुसावळ प्रतिनिधी दि 25
येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पू. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्थापना दिनी एकदिवसीय शिबिर वराडसीम तालुका भुसावळ येथे दिनांक 24 सप्टेंबर 23 रोजी संपन्न झाले. त्यात आज दिनांक 24 सप्टेंबर 23 रोजी स्मशानभूमी वराडसीम येथे स्वच्छता करून अंधश्रद्धा निर्मूलन करण्यात आले. तसेच वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.डी.गोस्वामी तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ.आर.एस.नाडेकर, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ.व्ही.एन.महिरे व महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. ममताबेन पाटील व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.डी. गोस्वामी सर यांनी विद्यार्थ्यांना एनएसएस स्थापना दिन व अंधश्रद्धा निर्मूलनावर अनमोल मार्गदर्शन केले. स्मशानभूमी बाबत असलेली अंधश्रद्धा व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांमधील गुणविशेष स्पष्ट केले.
त्यानंतर वराडसिम गावातून जनजागृती रॅली काढण्यात आली. त्यातून बेटी बचाव बेटी पढाव, अंधश्रद्धा निर्मूलन व स्री – पुरुष समानता याबाबत जनजागृती करण्यात आली.
त्यानंतर पंडित नेहरू विद्यालय वराडसिम येथे विवेक वाहिनी मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी रायपुर हायस्कूलचे मुख्याध्यापक संतोष पाटील व निखिल पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी वृक्षाला जलदान करून विवेक वाहिनी मंडळाचे उद्घाटन केले.
प्रमुख पाहुण्यांनी अध्यात्मातील वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर मार्गदर्शन केले.संतोष पाटील यांनी सहजयोग आजचा महायोग या ध्यानधारणेच्या प्रक्रियेतून वैज्ञानिक दृष्टिकोन स्पष्ट केला. डॉ. आर. एस. नाडेकर यांनी ध्यान कसे करावे हे स्पष्ट केले तर निखिल पाटील यांनी ध्यानाचे महत्त्व सांगितले.
सदर कार्यक्रमात प्रास्ताविक प्रा.डॉ.विलास महीरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा.ममताबेन पाटील यांनी मांडले.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वयंसेवक प्रफुल वाघमारे आणि लीना वारके यांनी केले.
सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.एस.व्हि.पाटील यांची प्रेरणा व मार्गदर्शन लाभले. तसेच उपप्राचार्य प्रा. डॉ. बी. एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य प्रा. डॉ. ए.डी. गोस्वामी यांचे मार्गदर्शन लाभले.