मुंबई : वाहतूक पोलिस विभागात प्रचंड भ्रष्टाचार वाढला असून त्याविषयी पोलिस आयुक्त व मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रारी देऊनही योग्य ती कार्यवाही झालेली नाही, असा गंभीर आरोप पोलीस हवालदार सुनील टोके यांनी केला आहे. काही महिन्यांपूर्वी टोके यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायालयानेही त्याची गंभीर दखल घेत मुंबई पोलीस आयुक्त व राज्य सरकारकडे स्पष्टीकरण मागितले आहे. या पार्श्वभूमीवर आपला छळ सुरू असल्याचा आरोप टोके यांनी 23 मे रोजी ‘स्पीड पोस्ट’ने राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रात केला आहे. हा भ्रष्टाचार उघडकीस आणल्याने वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी सातत्याने आपला मानसिक छळ चालवला आहे. त्यामुळे मला व माझ्या पत्नीला इच्छामरणाची परवानगी द्यावी’, असा धक्कादायक अर्ज पोलीस हवालदार टोके यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केला आहे.
राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रातील मजकूर
‘मी मधुमेह, हृदयविकार, ब्लडप्रेशर व किडनीच्या आजाराने 20 वर्षांपासून त्रस्त असून, याबाबत मुंबईतील रुग्णालयांत उपचार घेत आहे. परंतु, त्यासंदर्भात वरिष्ठ अधिकारी वारंवार संशय व्यक्त करून मला औषधोपचारांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. या सततच्या छळवणुकीमुळे मला वैद्यकीय उपचार घेणे शक्य होत नाही. त्यामुळे माझ्या प्रकृतीवर विपरित परिणाम होऊन माझे मरण अटळ आहे. या वेदना सहन करणे अशक्य होत असल्याने मला माझ्या पत्नीसह इच्छामरणाची परवानगी द्यावी’, असे सुनील टोकेंनी पत्रात नमूद केले आहे.