वरीष्ठ विभागीय आयुक्त ए.पी.दुबे महासंचालक पुरस्काराने सन्मानित

0

आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश व टोल फ्री क्रमांकाच्या जनजागृतीची दखल

भुसावळ- भुसावळ विभागातील गुन्हेगारी रोखण्यासाठी व मिशन 10 लक्ष साधल्यामुळे रेल्वेच्या आरपीएफ महासंचालक स्तरावर देण्यात येणारा राष्ट्रीय पातळीचा ‘दि डीजी’स इनसिगनीया अ‍ॅण्डकमंडेशन’ या आरपीएफमध्ये प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या पुरस्काराने नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमात आरपीएफचे महासंचालक धर्मेन्द्र कुमार यांच्या हस्ते भुसावळचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त अजय प्रकाश दुबे यांना नुकतेच सन्मानित करण्यात आले. देश सेवेत समर्पित भावना ठेऊन कार्य करणारी व्यक्ती म्हणून रेल्वेच्या सुरक्षा बलाने त्यांचा हा गौरव केला आहे.

भुसावळ विभागाला पहिल्यांदाच बहुमान
याबाबत माहिती देतांना वरीष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त दुबे म्हणाले की, देशातील प्रत्येक विभागात जो अधिकारी व त्यांचा चमू उत्कृष्ट कार्य करतात त्यांचा गौरव रेल्वे मंडळ व महासंचालक स्तरावर दरवर्षी करण्यात येत असतो. पहिल्यांदाच हा बहुमान भुसावळ विभागाला मिळाला आहे. वर्ष 2017 मध्ये आंतरराज्यीय चार टोळ्यांच्या मुसक्या आवळून गुन्हेगारी नियंत्रणात आणली तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी असलेल्या टोल फ्री नं 182 ची जागृती निर्माण करण्यासाठी मिशन 10 लक्ष पूर्ण केले याची नोंद रेल्वे मंडळ स्तरावर घेतली गेली व चमुचा नेता म्हणून हा सन्मान करण्यात आला आहे. गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश व हरीयाणा येथील आंतरराज्यीय टोळ्यांनी रेल्वेत धुमाकूळ घातला होता. भुसावळ विभाग मोठे असले तरीही गुन्हेगारांवर वचक बसावा व गुन्हेगारी मुक्त विभाग व्हावा हेच ध्येय आहे. यासाठी भुसावळ बडनेरा, भुसावळ नाशिक रोड व भुसावळ खंडवा या तीन क्षेत्रासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. ठोस व धडक कारवाई केल्यामुळे 2016 मध्ये केवळ 99 गुन्हेगार पकडले गेले ती संख्या 2017 मध्ये 243 तर 2018 च्या सप्टेंबरमध्ये 219 च्यावर पोहचली असून मागील महिन्यांत केवळ एक गुन्हा नोंद झाला आहे. भुसावळ यार्डातील पेट्रोल व डिझेलची चोरी आणि अन्य गुन्हेगारी रोखण्यासाठी 7 सप्टेंबर पासून विशेष पथकाची नियुक्ती व अतिरिक्त जवानांची नेमणूक करण्यात आल्याचे ते म्हणाले.

भुसावळात विभागात गुन्हेगारीत आली घट
मिशन 10 लक्ष गाठण्यासाठी छोट्या स्थानकापासून ते मोठया स्थानकांवर विविध अधिकारी व कर्मचार्‍यांनी वर्षभर प्रत्यक्ष प्रवाशांची संवाद साधला. यामुळे रेल्वे सुरक्षा बलाची प्रतिमा उंचावली. याची चर्चा विभागाबाहेर झाली तसेच रेल्वे मंडळातसुद्धा झाली. विशेष लक्ष केंद्रित करून व गुन्हेगारांची माहिती ठेवल्याने मध्य रेल्वेच्या पुणे, मुंबई, नागपूर, सोलापूर व भुसावळ या पाच विभागांपैकी भुसावळची गुन्हेगारीची सरासरी व गुन्हे नोंद कमी झाली आहे. यावर्षी मुंबई विभागात गुन्हे नोंदी जास्त म्हणजे 10 हजारावर नोंद झाली असून या बाबतीत भुसावळचा क्रमांक खाली आला आहे , असेही दुबे यांनी सांगितले. यावेळी सहायक सुरक्षा आयुक्त राजीव दीक्षित व सुरेश चंद्र उपस्थित होते.