बारामती । बारामती तालुका व परिसरात गेल्या तीन महिन्यातील पावसाळयात 180 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. खरीपाचे पिक आता हातात आले आहे. बारामतीच्या जिरायती भागातील बाजरीची कणसे विसावली आहेत. या भागातील मका व बाजरीची पिके अतिशय जोमदार आलेली आहेत.
सुपा, लोणीभापकर, काळखैरेवाडी, सायंबाचीवाडी, मुर्टी, मोढवे, नारोळी, कोळोली, पळशी, पवारवाडी, उंडवडी कडेपठार इ. 42 गावांना यंदाच्या पावसामुळे आधार मिळाला आहे. या भागाला भेट दिली असता तजेलदार दिसणारी पिके पाहिल्यावर कृषि विभागाचा अहवाल हा खरा की खोटा मानायचा? हा प्रश्न तयार होतो. कृषि खात्याने बारामतीच्या बागायती भागापेक्षा जिरायती भागाच्या विकासाकडे लक्ष देण्याची गरज आहे. असेही येथील शेतकर्यांनी सांगितले.