वरूण धरणार राहुलचा हात!

0

भाजप खासदार वरुण गांधी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये?

नवी दिल्ली : 2019 च्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपचे खासदार वरुण गांधी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा दिल्लीच्या राजकारणात रंगली आहे. यासंदर्भात वरुण यांनी अद्याप प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. वरूण गांधी हे हे मनेका गांधी यांचे पुत्र असून, राहुल गांधी यांचे चुलत भाऊ आहेत.

भाजपपासून वरूण दुरावले
गांधी कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येणार हे जवळपास निश्चित झाले आहे आणि लवकरच हे प्रत्यक्षात येईल. वरुण गांधी लवकरच काँग्रेसमध्ये दाखल होतील. 35 वर्षांनी गांधी कुटुंब एकत्र येणार असून, यामध्ये प्रियांका गांधी यांची भूमिका महत्त्वपूर्ण असेल, अशी माहिती काँग्रेस नेते हाजी मन्झूर अहमद यांनी एका वृत्तपत्राला दिली आहे. दिवंगत संजय गांधी यांचे पुत्र असलेल्या वरुण गांधी यांना भाजपमध्ये महत्त्व दिले जात नसल्याने ते भाजपपासून दुरावल्याचे काही दिवसांपासून दिसून येत आहे. वरुण यांनी अनेकदा पक्षाच्या आणि सरकारच्या धोरणांवर उघड टीका केली आहे.

पक्षविरोधी भूमिका उघडपणे मांडली
वरुण गांधी यांची आई मनेका गांधी या मोदी सरकारमध्ये मंत्री आहेत. वरुण यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर कधीही उघडपणे टीका केलेली नाही. त्यामुळे वरुण गांधी काँग्रेसवासी होऊ शकतात, असे मत उत्तर प्रदेश काँग्रेस समितीचे सदस्य राम टंडन यांनी व्यक्त केले. रोहिंग्या मुस्लीम, शेतकरी कर्जमाफी आणि त्यावरील राजकारणावरून यापूर्वी वरूण गांधी यांनी स्वपक्षावर टीका केली होती. यामुळे भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी वरूण यांच्यावर नाव न घेता टीकादेखील केली होती. मागील काही महिन्यांपासून वरूण गांधी हे भाजपपासून अलिप्त असल्याचे दिसत आहे.