भोर । भोर तालुक्यातील वीसगाव खोर्यातील वरोडी खुर्द येथील वनराई विकास संस्थेचे अभियंता आणि सामाजिक कार्यकर्ते विलास वरे यांच्या पुढाकाराने वरोडी गावचा परिसर आणि जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारात 2 हजार वृक्षांची लागवड करून पर्यावरण रक्षणाचा कानमंत्र देण्यात आला. आंबा, चिंच, नारळ यांसारख्या फळझाडांचा समावेश या दोन हजार वृक्ष लागवडीत असून, यात काही वृक्ष भोरच्या वनविभागातर्फे संस्थेस देण्यात आली होती.
अभियंता आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळख असलेल्या विलास वरे यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या वृक्ष लागवड उपक्रमात वरोडी गावच्या रस्त्याच्या दुतर्फा, जिल्हा परिषदेच्या शाळेसमोर आणि सार्वजनिक ठिकाणांसह अनेक शेताच्या बांधावरही वृक्ष रोपांची लागवड केली. वनराई विकास संस्थेने लावलेल्या या रोपांच्या संवर्धनाची जबाबदारी घेऊन निसर्गाचा होत असलेला र्हास थांबण्याची शपथ यावेळी घेण्यात आली. या उपक्रमातून पर्यावरण रक्षणाचा कानमंत्रच ग्रामस्थांना मिळाला आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रणजीत शिवतरे, पंचायत सदस्य श्रीधर किंद्रे, वनराई विकास संस्थेचे अध्यक्ष विकास वरे, संपत वरे, कृषी विभागाचे मंडल आधिकारी एस. के. साबळे, गाव कामगार तलाठी धनश्री हिरवे, तसेच सरपंच, उपसरपंच, सदस्य आदी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.