पुणे । पुणे महापालिकेच्या मालकीच्या जागेवरील दिशादर्शक कमानी आणि ताब्यात आलेल्या बीओटी तत्त्वावरील जाहिरात फलक महापालिकेकडून यंदा पहिल्यांदा ई-ऑक्शनद्वारे देण्यात आल्या आहेत. मात्र, त्यासाठीच्या कामाचे कार्यादेश संबधित कंपनीस देण्यापूर्वीच कंपनीकडून या फलकांवर जाहिराती लावण्यास सुरुवात केल्याचा आरोप शिवसेनेचे नगरसेवक बाळा ओसवाल यांनी केला आहे. वर्क ऑर्डर देण्यापूर्वीच जाहिराती लावणे ही बाब बेकायदेशीर असून संबधीत ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी ओसवाल यांनी केली आहे.
ओसवाल यांच्याकडे जाहिरातींच्या जागेची माहिती मागण्यात आली असून जाहिराती लावल्याचे निदर्शनास येताच तात्काळ कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. महापालिकेच्या मालकीच्या जागेवरील दिशादर्शक कमानी आणि ताब्यात आलेल्या बीओटी तत्त्वावरील जाहिरात फलक भाडेतत्वावर देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. त्यात ई-ऑक्शनमध्ये एकूण 63 दिशादर्शक कमानीचा स्वतंत्रपणे तीन जाहिरात फलकांचा लिलाव करण्यात आला होता. पण त्यात आधारभूत किंमत मिळाली नाही. त्यामुळे अखेर हे जाहिरात फलक भाडेतत्वावर देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला.
आयुक्तांनी लक्ष द्यावे
या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली. त्यानुसार हे काम मार्कस या कंपनीस देण्यात आले. मात्र, या कामाचे कार्यादेश तसेच काम देण्यात आलेल्या कंपनीशी करारानामा होण्यापूर्वीच या कंपनीने जाहिरात फलक लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे हा पालिकेच्या नियमांचा भंग केल्याचा दावा ओसवाल यांनी केला आहे. याबाबत तक्रार करूनही पालिका अधिकारी कारवाई करत नाहीत. त्यामुळे आता यामध्ये आयुक्त कुणाल कुमार यांनी लक्ष घालावे, अशी मागणीही ओसवाल यांनी केली आहे.