नवी दिल्ली । जेट एअरवेजच्या पायलटवर भारतीय संघाचा खेळाडू हरभजन सिंहने वर्णद्वेषाचा आरोप केला आहे. पायलटने एका भारतीय प्रवाशावर वर्णद्वेषी टिप्पणी करून त्याला मारहाण केल्याचा आरोप हरभजनने केला. संबंधित वैमानिकावर कारवाईची मागणी देखील हरभजनने केली आहे. जेट एअरवेजचा पायलट बर्न्ड होसलीन याने विमानात हरभजनच्यासमोर एका प्रवाशाला ‘ब्लडी इंडियन’ असे हिणवत विमानातून बाहेर जाण्यास सांगितले.
याशिवाय पायलटने एका दिव्यांग प्रवाशासह एका महिला प्रवाशासोबतही गैरवर्तन केले, अशी माहिती हरभजनने ट्विटवर हॅण्डलवर दिली. हरभजनने घडलेल्या प्रकरावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. पायलटने केवळ वर्णद्वेषी टिप्पणीच नाही, तर एका महिला प्रवाशासोबत गैरवर्तन देखील केले. तसेच एका दिव्यांग प्रवाशाला धक्काबुक्की आणि शिवीगाळ देखील केली, असे हरभजनने म्हटले आहे.