वर्तन बदलले तर परिवर्तन नक्की होईल

0

जळगाव। आापण जीवनात काही ठरवत नाही, काही प्लॅनींग नसते त्यामुळे ’जसं जमेल तसं’ संसार चालवतो. परंतु नियोजन करा म्हणजे सर्व सुरळीत होईल़ वर्तन बदलले तर परिवर्तन नक्की होईल, वादाकडून संवाद साधता आला पाहिजे, पती-पत्नीचे भांडण किती असावे तर ते गुड नाईट पर्यंतच. अलीकडे उच्च शिक्षण तरुणाईने घेतले असते मात्र तरीही घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे़ म्हणून विचार चांगले ठेवा, कारण ज्या मनुष्याचे विचार चांगले असते त्याला ताकदीची गरज लागत नाही तर ताकद तेव्हा लागते जेव्हा बृद्धी संपते, असा मूलमंत्र बुधवारी गोपी गिलबीले आणि अनिता गिलबीले यांनी दिला. पोलीस अधिकारी कर्मचारी व त्यांचे पत्नींसाठी तणावमुक्त जगण्याचा मूलमंत्र कार्यक्रम ’घरकुल’चे आयोजन आज पोलीस मुख्यालयाच्या मंगलम् हॉल येथे करण्यात आले होते. व्यासपीठावर जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, होम डीवायएसपी रशीद तडवी उपस्थित होते.

पोलिस म्हणून जगलो…
प्रास्ताविकात पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे म्हणाले की, पोलीस म्हणून जगलो, माणूस म्हणून जगलो नाही, पोलीसाची पत्नी म्हणून जगलो पण गृहिणी म्हणून जगलो नाही असेच वाटते. आजच्या या कार्यशाळेत मोकळेपणाने बोला, अधिकारी आहे म्हणून काय बोलू अशी भावना मनामध्ये न ठेवता प्रश्न विचारा. तसेच ’घरकूल’ म्हणजे घर आणि कूल म्हणजे शांत घर नेहमी शांत रहायला हवे त्यासाठी काय करायला हवे ते या कार्यशाळेतून जाणून घ्या असेही ते म्हणाले.

विचार बदलला तरच नशिब बदलेल
व्यक्तीमत्व हे एका दिवसात घडत नसून ते बालपणापासून घडत असते. सभोवतालच्या वातावरणाचा परिणाम देखील व्यक्तीमत्वाच्या विकासावर होतो. केवळ दिसण्याने व्यक्तीचे व्यक्तीमत्व ठरु शकत नाही. तर त्याचे विचार, वागणे यावर अवलंबून असते असे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी सांगितले. यावेळी त्यांनी ’तुच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या वामनराव पै यांच्या वाक्याचे उदाहरण देत सांगितले की, जीवनात चांगले गुण आत्मसात करा, प्रसन्न वातावरणामुळे आपणही प्रसन्न राहतो. त्यानुसार आपण विचार बदला म्हणजे नशीबही बदलेले असे आवाहनही जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी केले.

घटस्फोटाचे प्रमाण वाढले…
समाजात शिक्षण वाढले, ही प्रगती म्हणावी लागेल. परंतु त्याबरोबरच पतीपत्नीमध्ये घटस्फोटाचे प्रमाण वाढत असल्याचे क्लेशदायी चित्र समोर आले आहे. कौटुंबिक वादाची अनेक प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. दरवर्षाला एक लाख घटस्फोट होताहेत तर महिन्याला 40 हजार घटस्फोट होताहेत. जेवढे शिक्षण अधिक तेवढेच घटस्फोटदेखील जास्त असे दिसते आहे, असे सांगून गिलबीले म्हणाले, की, स्त्रीपुरूषाच्या आयुष्यात येणारी बरी वाईट स्थित्यंतरे सोसून त्या उभयतांना अधिक सक्षम आणि सशक्त बनविण्याचा अवसर देणारी शाश्वत व्यवस्था म्हणजे विवाह. अखंड आयुष्यभराची सोबत हा विवाहसंस्काराचा मूळ उद्देश आहे. परंतु आज त्याला छेद जातोय. आणि त्याला कारण मतभेद आणि मनभेद! यासाठी सहनशील वृत्तीची जोपासना करणे आवश्यक आहे. रमणी म्हणजे प्रत्येक पायाचा सार हा पायात दिला आहे. कदाचित आपणास नोकरी आवडीची मिळाली नसेल; परंतु मिळालेली नोकरी आवडीने करायला हवी. त्याचप्रमाणे कदाचित मुलगी आवडीची मिळाली नसेल; पण मिळालेल्या पत्नीबरोबरच संसार आवडीने करा. यातुन कुटुंब स्थिरावते आणि सुखावते, असे त्यांनी सांगितले. आपण जसे समजतो, मुले तसेच बनतात. तू करू शकतोस, मुळात तू हुशार आहेच असे म्हणा, त्याचे परिणामकारक रिझल्ट मुलांमध्ये दिसतील, असा विश्वास गोपी गिलबीले यांनी व्यक्त केला.

दारुची नशा उतरते, पैशाची नशा उतरत नाही
असे एकही घर नाही जिथे पती-पत्नीचे भांडण होत नाही़ त्यातून जीवन कसे बॅलेन्स करावे हे महत्वाचे असते. दिसणं म्हणजे बाहेरुन, आणि असणं म्हणजे आतून यावर जीवन अवलंबून असते. वादाचे अनके कारणे आहे़ त्यातही जे लोक बोलत नाही ते कारण मुख्य असते़ याकरीता प्रत्येकाने स्वत:ला बदलल पाहिजे तरच जग बदलेल. कारण विचाराने दिशा ठरते आणि दिशा ठरली तर दशा होणार नाही़ एकवेळ दारुची नशा उतरते मात्र पैशाची नशा उतरत नाही. तेच लोक विभागाची दुरर्दशा करतात असे गिलबिले यांनी मार्गदर्शनात सांगितले.

कुटूंबाला वेळ द्या..
मुलांना नेहमी सांगितल्या जाते की अभ्यास कऱ पण अभ्यास म्हणजे केवळपुस्तक डोळ्यासमोर ठेव किंवा नुसतेच लिखाण कर असे नाही़ तर मनाने अभ्यास करायला हवा. तुम्ही फक्त दिवसातून तीन वेळा ’माझा मुलगा हुशार आहे’ असे म्हणा. त्याच्यात नक्की परिवर्तन दिसेल. देशातील पहिल्या 10 श्रीमंतापैकी एकही पदवीधर नाही, म्हणून अभ्यासाची पद्धती बदला़ धडा वाचनापेक्षा प्रश्न वाचा़ त्यानंतर धडा वाचतांना उत्तर लगेच कळेल़ याकरीता नियोजन महत्वाचे आहे़ आपण मुलांना जसे समजतो तसे घडतो. वयाच्या 7 महिन्यापासून ते 7 वर्षापर्यंत व्यक्तीमत्व घडत असते. त्यामुळे कुटुंबाला थोडातरी वेळ द्या असेही गिलबिले यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले.

चुकीच्या मार्गाने कमविलेला पैसा घातक
गोपी तसेच अनिता गिलबीले यांनी अतिशय मार्मिकपणे जीवनशैली तणावमुक्त कशी जगता येईल, याचे स्पष्टीकरण सविस्तरपणे देऊन सुखी जीवनाचा मूलमंत्र सांगितला. मुलांकडे जशा नजरेने बघाल तसेच ते घडतील, म्हणून मुलांचे व्यक्तिमत्व फार महत्त्वाचे असल्याचे गिलबिले यांनी सांगितले. मुलांवर संस्कार करण्याची जबाबदारी प्रामुख्याने आईची असते. संस्कारातून मुलगा घडविता येतो, हे तर जिजाऊंचे उदारहरण आपल्यापुढे आहे. मुले आईवडीलांचे आचरण करत असतात; त्यामुळे पालकांनी अधिक सजग असणे आवश्यक आहे. मुलाला नेहमी दोष देणे हे योग्य नाही. परंतु त्याला हुशार म्हटल्यास त्याचे परिणाम चांगलेच दिसण्यास मदत होते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुलांचा अभ्यास आणि संस्कार हे मुलांचे भवितव्य घडवितात, नुसती मार्कांची गुणवत्ता चालणार नाही, तर संस्कारांचीदेखील त्यास जोड हवी, यासाठी आई वडील यांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. पैसा ज्या मार्गाने येतो, त्यामार्गाने जातो. म्हणून आपण कुठल्या मार्गाने पैसे कमवितो हे अधिक महत्त्वाचे आहे. चुकीच्या मार्गाने कमविलेला पैसा घातक ठरतो. भ्रष्टाचारी मार्गाने पैसे कमवून श्रीमंती दाखविण्याची हौस वाईटच असते. त्यात कुटुंबाचे हित होत नसते. उलट ज्याच्याजवळ पैसे असतात ते साध्या पध्दतीने राहतात अन् साधेच वागतात. पैशांपेक्षा मुलगा कर्तबगार निघावा, याकडे लक्ष दिल्यास त्यातून जीवनात समाधान मिळू शकते, असा मंत्र गिलबीले दाम्पत्याने दिला.

उपस्थितांना दिल्या टिप्स्
निगेटीव्ह लोकांना कशात इन्टरेस्ट नसतो. ते स्वत: नकारात्मक असतात. पण दुसर्‍यांचे दोष दाखविण्यात ते खुप माहिर असतात. आपण काय? ते दडवून ठेवायचे आणि दुसरीकडे बोट दाखवायचे अशी त्यांची मानसिकता असते. काहींची जळाऊवृत्ती असते, तर काहींना नेहमी दोष शोधण्याची व्याधी असते. काही जण तर बायकोंवरदेखील प्रभाव दाखविण्याचा प्रयत्न करतात. म्हणतात कसे? कार्यालयाची मोठी जबाबदारी माझ्यावर, नाही तर साहेबांचे अडून जाईल! माझ्याशिवाय शक्य नाही ते? अशा अर्विभावात फुशारकी मारताना दिसतात. असे नकारात्मक लोक हट्टी असतात. अशा वेळी न बोलणे चांगले असते. डिपार्टमेंटच्या लोकांनी राजकीय व्यक्तिं शी संबंध ठेवू नये, असा सल्ला देऊन गिलबिले म्हणाले, जो राजकारण करतो तो आतल्या आतही (मनात) पॉलीटीक्स करतो. ज्या माणसाची स्व:प्रतिमा वाईट असते त्याला सर्व जग वाईट दिसते. खरं तर दुसर्‍याला वाईट बोलण्याचा आपणास अधिकार नाही. त्यामुळे त्यापासून दुर राहिलेलेच बरे असते. सकारात्मक विचारांतून जीवनाला दिशा मिळते आणि त्यात जीवनाचे यश दडलेले असते. जिथ जावं तिथं रमून जावं, कामाशी एकरूप व्हावं, जे काही करायचे आहे ते स्वयंस्फूर्तीने करावे अशा शैलीची कुठेही नक्कीच प्रशंसा होते, अशा पध्दतीचे मार्गदर्शन त्यांनी केले.