वर्तमानपत्रांची भूमिका : काल आणि आज

0

वृत्तपत्रे हा मानवी जीवनाचा एक आवश्यक घटक आहे. म्हणूनच वृत्तपत्राला लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ म्हटले जाते. रोजच्या ताज्या घडामोडी घेऊन येणारे वृत्तपत्राचे स्थान आजही माहिती तंत्रज्ञानाच्या युगात अनेक वेगवान प्रसार माध्यमे असतानाही टिकून आहे. यावरूनच आपल्याला वृत्तपत्राचे महत्त्व व भूमिका कळून येते. विश्‍वसनीय माहिती, ज्ञान, प्रबोधन आणि मनोरंजन करणारे विविधांगी मजकूर वृत्तपत्रातून प्रकाशित केले जाते. म्हणूनच वृत्तपत्राला समाजमनाचा आरसा संबोधला जातो.

चौदाव्या शतकात चीनमध्ये कागदाचा शोध लागल्यानंतर जर्मनीमधील जोहान्स गुटेनबर्ग याने इ.स.1436ला मुद्रणाचा शोध लावला. त्याने अक्षराचे खिळे तयार करून आपल्याच मुद्रणालयात बायबलची छपाई केली. त्याबरोबरच लेखनाचे अनेक दालने खुली झाली व ज्ञानाचे क्षेत्र व्यापक बनले. जगातील पहिले वृतपत्र इ.स.1780ला लंडन ग्यझेट इंग्लंडमध्ये प्रसिद्ध झाले. भारतामध्ये पहिले वृत्तपत्र जेम्स आँगस्टस हिक्कीने बेंगॉल सहूझेट इ.स.1780मध्ये इंग्रजी भाषेत सुरू करून ईस्ट इंडिया कंपनीवर त्याने टीकात्मक लिखाणही केले. भारतात वृत्तपत्रसृष्टीचा पाया रोवला गेला.

समाचार दर्पण हे भारतीय भाषेतील प्रकाशित होणारे पहिले वृत्तपत्र होय. त्यानंतर भारतीय लोकांना पाश्‍चिमात्य ज्ञानाचा अभ्यास व्हावा, देशाची समृद्धी व कल्याण व्हावे, या उद्देशाने दर्पणची सुरुवात 06जानेवारी 1832मध्ये मराठी भाषेतून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी केली व मराठी भाषिकांना विचार प्रवृत्त करण्यास भाग पाडले, तर कृष्णराव भालेकर यांच्या दिनबंधू वृत्तपत्राने बहुजन समाजाच्या चळवळीत महत्त्वपूर्ण कार्य करून बहुजन समाजाला न्याय व अन्यायाची जाणीव करून देण्यास महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात केसरी व मराठा या वृत्तपत्राची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे. लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी जनतेच्या मनात ब्रिटिश शासनाविरोधात असंतोष निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य याद्वारे केले. राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नाही, शासनाचे डोके ठिकाणावर आहे का?, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, अशा आपल्या प्रखर लिखाणातून लोकमान्य टिळकांनी इंग्रज शासनाविरोधात रणशिंग फुंकले. त्याचाच परिणाम म्हणजे तत्कालीन वृत्तपत्रावर बंदी व कठोर निर्बंध लावण्यात आले. यावरूनच वृत्तपत्राची स्वातंत्र्यलढ्यात समाजपरिवर्तन घडवण्यात किती महत्त्वपूर्ण भूमिका होती, हे स्पष्ट होते. वृत्तपत्रांचा महत्त्वपूर्ण उद्देश म्हणजे समाजात लोकजागृती घडवणे, अयोग्य घटनांचा निषेध करणे, कमजोर घटकांना शक्तिशाली बनवणे व दैनंदिन घटना नोंदवणे हा होय. त्यामुळेच वृत्तपत्रांतून अनेक वाईट गोष्टींचा निषेध केला जातो. सत्य घटना व वास्तवचित्र समाजापर्यंत पोहोचवत असताना पूर्वीसुद्धा अनेक वृत्तसंपादकांना शिक्षा देण्यात आली होती, तर कधी वृत्तपत्रांवर बंदी घातल्या गेली. डॉ. नरेंद्र दाभोळकर व गोविंद पानसरे या समाज प्रवर्तकांना बंदुकीच्या गोळ्यांनी गाडले जाते व पुन्हा रामरहिम नावाचे विषारी साप दंश करण्यास आपले डोके वर काढतात.

ए. एम. कलबुर्गी व आताच झालेल्या कानडी पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लोकशाही विचारांची हत्याच होय! गेल्या तीन वर्षांत 10 पत्रकार मारल्या गेले, तर अनेक पत्रकारांना जीवे मारण्याच्या धमक्या व हल्ले करण्यात आले ही खर्‍या लोकशाहीची सरेआम हत्याच होय! वृत्तपत्र हे माहिती व मनोरंजनाचे एक प्रभावी माध्यम असून, त्यातून ज्ञान, विज्ञान, वैचारिक व मनोरंजनात्मक लिखाण केले जाते. समाजाला योग्य दिशा दाखवण्याचे, चांगल्या गोष्टींना न्याय देणे, वाईट गोष्टींवर तीव्र प्रहार करून सत्य घटना समाजासमोर आणण्यात वृत्तपत्रांची महत्त्वपूर्ण भूमिका असून, ती लेखणीतून मांडणे आज काळाची गरज आहे. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नये, यासाठी शासनानेसुद्धा योग्य व निर्णायक उपाययोजना करून अशा हल्ल्याखोरांना कठोर शिक्षा करायला पाहिजे. समाजातील वाईट विचारांचा निषेध करू या! समाजातील खरे वास्तवचित्र आपल्या लेखणीने प्रकाशित करू या!

-प्रा. वैशाली देशमुख
7420850376