पिंपरी-चिंचवड : शहरात सर्वत्र वाहतूक कोंडीची समस्या जाणवते. वाहनांची वाढती संख्या, वाहतूक नियंत्रणात अपुरी पडणारी वाहतूक पोलीस यंत्रणा, नागरिकांची बेशिस्त, रस्त्याच्या बाजूला असलेल्या व्यापार्यांची मनमानी तसेच हातगाडी व फेरीवाल्यांची अरेरावी यासारख्या कारणांमुळे वाहतूक कोंडीच्या समस्येत भर पडत आहे. महापालिकेने अनेक रस्त्यांवर पदपथ उभारले आहेत. मात्र, या पदपथांचा वापर पादचार्यांना अतिक्रमणामुळे करता येत नाही. त्यामुळे शहरात असलेल्या वर्दळीच्या रस्त्यांवरील पदपथ काढून टाकावेत, अशी मागणी नागरी हक्क सुरक्षा समितीने केली असून, या विषयासंदर्भात महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे.
पदपथांवर अतिक्रमण
शहरातील बहुतेक रस्त्यांवर महापालिकेने पदपथ बांधले आहेत. परंतु या पदपथांवर अनेक टपर्या, हातगाडीधारकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे पदपथांचा वापर पादचार्यांना करता येत नाही. पदपथांवरील अतिक्रमण हटवून तेथील टपर्या, हातगाड्या व फेरीवाल्यांचे दुसरीकडे पुनर्वसन करावे. डांगे चौक, काळेवाडी फाटा, भोसरी येथील उड्डाणपुलांजवळ दररोज मजूर अड्डे भरतात. या मजूर अड्ड्यांसाठीदेखील वेगळी जागा दिली पाहिजे. तसेच शहरातील मुख्य रस्त्यांवर दोन्ही बाजूला असलेल्या वाहनांच्या अनधिकृत पार्किंगवर निर्बंध आणावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर अध्यक्ष मानव कांबळे, प्रदीप पवार, गिरीधारी लड्डा, दिलीप काकडे, उमेश इनामदार, अशोक मोहिते यांच्या स्वाक्षर्या आहेत.