भुसावळ। शहरातील वर्दळीच्या यावल रस्त्यावर रहदारीला अडथळा निर्माण होईल या पद्धत्तीने मंडप टाकून दुकाने सुरू करणार्या पाच व्यावसायिकांवर शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले यांनी कारवाईचा बडगा उगारत नोटीसा बजावल्याने दुकानदारांमध्ये चांगलीच खळबळ उडाली.
दुकानदारांना मुंबई पोलीस अॅक्ट 102, 117 प्रमाणे नोटीस बजावण्यात आली असून त्यांना मंगळवारी न्यायालयात दंड सुनावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सहा.निरीक्षक गंधाले यांच्यासह हवालदार सोमनाथ मोरे, गोविंद पाटील, चालक अविनाश पाटील यांनी सोमवारी दुपारी ही कारवाई केली. दत्त बेकरीचे रवींद्र लढे, आर.के.मिठाईचे नीरंजन शर्मा, राखी दुकानाचे मालक राजू भोईटे, राधाकृष्ण स्वीट मार्टचे रामदास अग्रवाल, यशवंत डेअरीचे नंदकिशोर महाजन यांना कारवाईची नोटीस बजावण्यात आली. वाहतुकीला अडथळा आणणार्यांवर कारवाई सुरूच राहील, असेही गंधाले यांनी सांगितले.