वर्ध्यातील अट्टल महिला चोर मेहुणबारे पोलिसांच्या जाळ्यात

0

पारोळ्यासह जिल्हाभरात चोर्‍यांची कबुली ; खिवे कापताना जमावाने पकडले

मेहुणबारे- शुक्रवारच्या आठवडे बाजारात गर्दीचा फायदा घेवून खिसे कापताना वर्ध्यातील तीन महिलांना जमावाने पकडल्याची घटना 7 रोजी सायंकाळी पाच वाजता घडली. पोलिसांनी लागलीच धाव घेत महिलांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची विचारपूस केली असता त्यांनी पारोळ्यासह जिल्हाभरात चोरी केल्याची कबुली दिली. अटकेतील महिला या अट्टल चोर असून त्या वेगवेगळे पत्ते पोलिसांना सांगत असल्याने त्यांची कसून चौकशी सुरू असून त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या महिलांच्या अटकेनंतर जिल्ह्यात अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता सहाय्यक पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांन ीवर्तवली.

खिसे कापताना रंगेहाथ पकडले
7 रोजी गावाचा बाजार असताना तीन महिलांना खिसे कापताना रंगेहाथ पकडण्यात आल्यानंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिस चौकशीत त्यांनी आपली नावे इंदू आनंदा गायकवाड (अशोकनगर, वर्धा), सोनी जगत राखुंडे (अशोक नगर, वर्धा) व कांताबाई प्रेम गायकवाड (अशोक नगर, वर्धा) असल्याचे सांगितले. पोलिसांनी खोलवर केलेल्या चौकशीत आरोपी महिलांनी बुधवारी सकाळी बसमध्ये चढणार्‍या जळगावचे रीयाज शेख कासम खाटीक (48, जळगाव) यांचा बॅगेतील सोन्याचा डब्बा लांबवल्याची तसेच जिल्ह्यात अनेक ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी पारोळा पोलिसांकडून फुटेज मिळवत याबाबत अधिक चौकशी सुरू केली आहे. मेहुणबारे पोलिसात पंढरीनाथ सोनजी महाजन (रा.दरेगाव) यांच्या फिर्यादीनुसार तिघा महिलांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. महिलांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जयपाल हिरे करीत आहेत.