लंडन-गेल्या दोन वर्षांत दुखापतींमुळेच चर्चेत असलेला दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेनंतर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे सांगितले. तसेच शक्य होईल तोपर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये खेळत राहणार असल्याचे स्टेनने स्पष्ट केले.
प्रदीर्घ अनुभवाच्या बळावर दक्षिण आफ्रिकेच्या विश्वचषक संघात मला स्थान मिळेल, असा आशावाद स्टेनने प्रकट केला. कसोटी क्रिकेटविषयी स्टेन म्हणाला, ‘‘कसोटी क्रिकेट मात्र मी दीर्घकाळ खेळत राहीन. बऱ्याच दुखापतींतून मी सावरलो आहे. भारताविरुद्धच्या पहिल्याच कसोटीत खांद्याला दुखापतीमुळे मालिका सोडावी लागली होती. त्यातून सावरणे अतिशय आव्हानात्मक ठरले. मात्र श्रीलंकेविरुद्धचे दोन कसोटी सामने मी खेळून तंदुरुस्ती सिद्ध केली आहे.’’
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत स्टेनला बळी मिळवण्यासाठी झगडावे लागले होते. पहिल्या कसोटीतील दोन्ही डावांत त्याला एकेक बळी मिळाले होते, तर दुसऱ्या डावात त्याला एकही बळी मिळाला नव्हता. दक्षिण आफ्रिकेने यजमान श्रीलंकेला २-० अशी धूळ चारली होती.
इंग्लंडच्या विजयाची खात्री
भारत आणि इंग्लंड यांच्यातील बहुप्रतीक्षित क्रिकेट कसोटी मालिका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना ही मालिका कोण जिंकणार, याविषयी अनेक विशेषज्ञ आपापली मते मांडत आहेत. दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज डेल स्टेननेही इंग्लंडच्या विजयाची खात्री देताना त्यांच्यावर यासाठी पैसेही लावायला तयार आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.