पक्षी व प्राण्यांबद्दल भरपूर उपयुक्त माहिती मिळणार
पिंपरी : लौकिक सोमण यांच्या सौजन्याने किलबिल स्कूलचे संचालक रफिक सौदागर यांच्या सहकार्याने दिल्ली पब्लिक स्कूल इन असोसिएशन व फिरूया डॉट कॉम यांच्या सहयोगाने रहाटणी येथील कापसे लॉन्समध्ये अनोख्या अशा प्रदर्शनाला सुरूवात झाली. वर्ल्ड ऑफ पेट्स या पक्षी आणि प्राण्यांच्या अनोख्या प्रदर्शनाचे उद्घाटन भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. 3 जूनपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे, सखाराम नखाते सोबत आदी उपस्थित होते. कोणता तरी पाळीव प्राणी अथवा पक्षी, मासे घरी घेऊन येणे हा आजच्या काळातील आवडता छंद बनला आहे. पण त्याला योग्य पद्धतीने सांभाळावे कसे, त्याला अनुकूल असणार्या गोष्टी कोणत्या, त्याच्या व्याधींविषयी कसे समजेल यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे आणि त्याचबरोबर पक्षी व प्राण्यांबद्दल भरपूर उपयुक्त माहिती ‘वर्ल्ड ऑफ पेट्स’ या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळणार आहे.
पक्ष्यांच्या 200 जाती पाहू शकणार
आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, चीन आणि इतर देशांतील पक्ष्यांच्या 200 जाती, बघण्याची संधी त्याचबरोबर मत्स्य प्रदर्शन तसेच वेगवेगळ्या जातीचे कुत्रे आणि मांजरी आणि पक्षी व प्राण्यांबद्दल भरपूर उपयुक्त माहिती ‘वर्ल्ड ऑफ पेट्स’ या पक्षी आणि प्राण्याच्या अनोख्या प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरीकांना मिळणार आहे. यामध्ये अरकारी टोकन, स्टेलास, आफ्रिकन पोपट, कनूर जातीचे रंगीबेरंगी पक्षी, हाताच्या बोटावर बसणारे लव्ह बर्डस, फिंचेस, परदेशी रंगीत कोंबड्या, परदेशी बकर्या, गिनिपिग तसेच पूर्ण खर्या झाडांनी सजवलेली सुमारे 30 मत्स्यालये आणि माश्यांच्या 100 हून अधिक जाती तसेच त्यामध्ये समुद्री खार्यापाण्यातील सुमारे 30 जातींचे मासे मत्स्यप्रेमींना बघण्याची सोय उपलब्ध आहे.
त्याशिवाय, शिह्त्झू, ल्हासा अॅप्सो, पेकीग्नीज, ब्रिटीश बुलडॉग, कॉकर स्पॅनीयल, चीहूआहुआ यांसारख्या छोट्या आकाराच्या जातींच्या कुत्र्यांची प्रत्यक्ष माहितीही येथे घेता येणार आहे. तसेच पर्शियन मांजरांच्या अदा, त्यांच्या हालचाली आणि वेगवेगळ्या रंगात वाढणार्या अशा इतर दहा ते पंधरा जाती प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत .