तळेगाव । इंदोरी येथील श्री दत्तात्रय कानिफनाथ देवस्थान सेवा ट्रस्ट यांच्या वतीने गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या राजश्री जुन्नरकर हिचा धर्मरत्न वासुदेव महाराज गरुड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अवघ्या 20 वर्षाच्या राजश्रीने 11 कि. मी. लांबीची रांगोळी काढण्याचा विश्वविक्रम केला आहे. तिला गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या पुरस्काराने अलोक कुमारजी यांच्या हस्ते गुजरातमध्ये सन्मानित करण्यात आले. त्या निमित्ताने श्री दत्तात्रय कानिफनाथ देवस्थान सेवा ट्रस्ट इंदोरीचे संस्थापक धर्मरत्न वासुदेव महाराज गरूड यांच्या हस्ते राजश्री जुन्नरकर हिला सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष खंडू उर्फ पुंडलिक गरूड, विशाल परदेशी, ऋषिकेश लोंढे, राजु चिंचवडे, निलेश खांदवे, मुकेश शिंदे, अशोक बोत्रे, विशाल कदम, रोहीदास राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
रांगोळीच्या पायघड्या
राजश्रीने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात रांगोळीच्या पायघड्या साकारल्या होत्या. त्याचप्रमाणे सुरत येथे सुरती राजाच्या मिरवणुकीत नॉनस्टॉप अकरा किलोमीटर रांगोळीच्या पायघड्या घालत विश्व विक्रम केला आहे. तिच्या विश्वविक्रमाची गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या संस्थेने नोंद घेतली. या रांगोळीसाठी तिने 25 पोती पांढरी रांगोळी व 80 किलो रंगीत रांगोळी वापरली.