संतोष पाटील यांची लागली वर्णी
हे देखील वाचा
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेला तब्बल वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर अतिरिक्त आयुक्त मिळाले आहेत. नांदेड जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी वर्णी लागली आहे. चार दिवसांपूर्वीच महसूल विभागाने याबाबतचा आदेश पारित केला आहे. पिंपरी महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांची 1 जून 2017 रोजी बदली झाली. त्यांच्या जागी मीरा भाईंदर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अच्युत हांगे यांची वर्णी लागली होती. परंतु, हांगे पिंपरी पालिकेत जास्त काळ टिकले नाहीत. केवळ चार महिन्यातच त्यांची तडकाफडकी बदली झाली. 1 जून 2017 रोजी पिंपरी-चिंचवड महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदावर रुजू झालेल्या हांगे यांची 25 ऑक्टोबर 2017 रोजी तडकाफडकी बदली झाली.
मुख्याधिकारी संवर्गातील हांगे यांची लातूर महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून पिंपरी पालिकेचे अतिरिक्त आयुक्तपद रिक्त होते. सहायक आयुक्त प्रवीण अष्टीकर यांच्याकडे अतिरिक्त आयुक्तपदाचा पदभार दिला होता. वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नांदेड जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची नियुक्ती झाली आहे. याबाबतचा आदेश महसूल विभागाने पारित केला आहे. येत्या चार दिवसात ते पालिकेत रुजू होतील, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.