आयुक्तपदाचा पदभार हाती घेऊन वर्षपूर्तीनिमित्त श्रावण हर्डीकर यांच्याशी संवाद
स्मार्ट सिटी, प्रधानमंत्री आवास योजना, मेट्रो, बीआरटीच्या कामाला चालना देणार
पिंपरी-चिंचवड : शहरात विकास कामे करण्यास मोठा वाव आहे. आगामी काळात करण्यात येणा-या कामाचे पहिल्या वर्षात नियोजन केले. केंद्र सरकार पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आता अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येईल. त्यामध्ये स्मार्ट सिटी, प्रधानमंत्री आवास योजना, मेट्रो, बीआरटी, आंद्रा-भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याच्या प्रकल्पाच्या कामाला चालना देणार असल्याचे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. तसेच पहिल्या वर्षभरात कच-याचा प्रश्न सोडविता आला नसल्याची खंतही त्यांनी बोलून दाखविली. आयुक्तपदाचा पदभार हाती घेऊन हर्डीकर यांना शुक्रवारी एक वर्ष पुर्ण झाले. यानिमित्त त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
सुधारित विकास आराखड्यासाठी पाऊल
शहराचा विकास आराखडा कालबाह्य झाला होता. विकास आराखडा सुधारित करण्यासाठी पाऊले उचलली. त्याचे काम देखील वेगात सुरु आहे. केंद्र सरकार पुरस्कृत योजना पुर्ण करण्यासाठी नियोजन केले आहे असे सांगत आयुक्त हर्डीकर म्हणाले, पहिल्या वर्षात संपु्र्ण शहराची माहिती घेतली. आगामी काळात करण्यात येणार्या विकास कामांचे नियोजन केले आहे. आता प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यावर भर दिला जाईल. वेळेत विकासकामे पुर्ण करण्यासाठी प्रयत्नशिल राहणार आहे. राहिलेल्या मार्गावर बीआरटी सुरु केली जाईल. शहरात मेट्रोचे काम वेगात सुरु असून ते वेळेत पुर्ण करण्यात येईल.
स्मार्ट सिटीची प्राथमिक कामे पूर्ण
पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता असते. ही कमतरता कमी करण्यासाठी कायम स्वरुपी उपाय म्हणून वायसीएम रुग्णालयात पदव्युत्तर मेडिकल संस्था सुरू करण्यात येणार आहे. संस्था लवकरात-लवकर करण्यासाठी प्रयत्नशिल आहे. संस्था सुरु झाल्यास पालिकेला डॉक्टर उपलब्ध होतील. शहरातील नागरिकांसाठी आंद्रा-भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याच्या प्रकल्पाच्या कामाला चालना देण्यात येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरात 50 हजार घरे बांधण्याचे उद्द्ष्टि आहे. रावेत, मोशी येथील गृहप्रकल्पाला मंजूरी देण्यात आली आहे. त्याचे काम देखील प्रत्यक्षात लवकरच सुरु होईल. उर्वरित प्रकल्पाला देखील मंजूरी घेण्यासाठी प्रयत्निशल आहे. स्मार्ट सिटीची प्राथमिक कामे झाली आहेत. प्रत्यक्षात त्याची कामे पुर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे. पार्किग पॉलीसी तयार केली आहे. गटनेत्यांसमोर त्याचे सादरीकरण देखील झाले आहे. लवकरच त्याचे धोरण महासभेसमोर आणले जाईल. महासभेची मान्यता घेऊन त्याची अमंलबजावणी करण्यात येईल. सायकल शेअरिंग योजना देखील सुरु करण्यात येणार आहे.
‘एचए’ची जागा सार्वजनिक सुविधांसाठी
शहरात झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित असून त्यावर देखील काम सुरु केले. हिंदुस्थान अॅन्टीबायोटिक्स (एचए) या कंपनीची 59 एकर जागा सार्वजनिक सुविधांसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका घेणार आहे. याबाबतचा प्रस्तावाला महासभेची मान्यता घेऊन राज्य सरकारकडे पाठविला आहे. सुधारित क्रीडा धोरण तयार केले आहे. टेनिस, बॅडमिंटन, कुस्ती, शुटिंग या खेळावर लक्ष्य केंद्रित केले जाणार आहे. थेरगावातील क्रीडा अॅकडमीचे काम उत्कृष्टपणे सुरु आहे. हॉकीपटू धनराज पिल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडू तयार करण्यात येणार असल्याचेही, आयुक्तांनी सांगितले.
कचर्याचा प्रश्न लवकरच मार्गी
घरोघरचा कचरा गोळा करुन मोशी डेपोपर्यंत नेणे. ओला, सुका आणि घरगुती घातक कचरा विलगीकरण करणे आणि घरातला कचरा उचलून डेपोपर्यंत नेऊन त्यावर योग्य प्रक्रिया करणे. हा प्रश्न मार्गी लागणे अपेक्षित होते. परंतु, हा प्रश्न मार्गी न लागल्याची खंत व्यक्त करत आयुक्त हर्डीकर म्हणाले, शहरातील कचर्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशिल असून लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल. ओला कचरा घरातच जिरविणे गरजेचे आहे.