वर्षभरात पॅसेंजर बंद होवून मेमू धावणार

0

डीआरएम विवेककुमार गुप्ता : भुसावळ विभागातून पाच तेजस ट्रेन धावणार : भुसावळात 2021 मध्ये मेमू दुरुस्तीचा कारखाना होणार सुरू

भुसावळ- देशभरातील शंभर रेल्वे मार्गावरून 150 खाजगी तेजस ट्रेन धावणार असून त्यातील पाच गाड्या या भुसावळ विभागातून धावणार असल्याची माहिती डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी येथे दिली. डीआरएम कार्यालयातील सभागृहात गुरुवारी सायंकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत अर्थसंकल्पात भुसावळ विभागाच्या वाट्याला आलेल्या निधीबाबत सविस्तर माहिती दिली. गुप्ता म्हणाले की, वर्षभरात पॅसेंजर ट्रेन बंद करण्यात येणार असून त्याऐवजी जलदगतीच्या मेमू ट्रेन धावणार आहेत शिवाय भुसावळात मंजूर असलेला मेमू दुरुस्तीचा कारखाना सप्टेंबर 2021 पर्यंत कार्यान्वित होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

भुसावळ विभागातून पाच ‘तेजस’ धावणार
देशभरातून सुमारे शंभर रेल्वे मार्गावरून 150 खाजगी तेजस ट्रेन धावणार असून त्यातील पाच भुसावळ विभागातून धावतील. त्यात मुंबई-नागपूर, मुंबई-बनारस, पुणे-पटना, नागपूर-पुणे, सुरत-बनारस या गाड्यांचा समावेश असून वेस्टर्न झोनमधून मुंबई-अहमदाबाद ट्रेन धावणार आहे. डीआरएम म्हणाले की, जळगाव-भुसावळदरम्यानच्या तिसर्‍या व चौथ्या लाईनसाठी एकूण 65 कोटी मंजूर झाले असून एप्रिल महिन्यापर्यंत तिसर्‍या लाईनचे काम पूर्ण होणार आहे त्यामुळे सुरतकडून येणार्‍या गाड्यांना विलंब होणार नसून वाहतुकीची समस्याही सुटणार आहे.

भविष्यात गाड्या ताशी 160 वेगाने धावणार
रेल्वेत प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य असून अर्थसंकल्पात इन्फ्रास्ट्रक्चर, सिग्नल यंत्रणा तसेच स्थानक विकासासह प्रवाशांसाठी विविध सोयी-सुविधांना प्राधान्य देण्यात आले आहे. भविष्यात गाड्यांचा वेग प्रति तासी 130 किलोमीटर व नंतर 160 किलोमीटर केला जाईल त्यामुळे वेळेची बचत होईल, असेही ते म्हणाले. सेंट्रल रेल्वेत आरओबी पुलांसाठी सुमारे 1500 कोटी मंजूर झाले असून भुसावळ विभागासाठी त्यात 400 कोटींचा समावेश आहे. जळगाव-मनमाडदरम्यानच्या तिसर्‍या रेल्वे लाईनसाठी 205 कोटी मंजूर झाले असून प्रवासी सुविधांसाठी एकूण 250 कोटी मंजूर असून त्यात भुसावळ विभागासाठी 30 ते 40 कोटी मंजूर आहेत.

सप्टेंबर 2021 अखेर मेमू दुरुस्तीचा कारखाना
भुसावळात मेमू दुरुस्तीचा कारखाना (कार शेड) मंजूर असून सप्टेंबर 2021 पर्यंत त्याचा शुभारंभ होईल, असे डीआरएम यांनी सांगत वर्षभरात मेमू रॅक पुरेसे उपलब्ध झाल्याने पॅसेंजर सेवा बंद करून त्याऐवजी मेमू ट्रेन सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. भुसावळ-नरखेड मेमू सुविधा सुरू करण्यात आली असलीतरी त्यातील नळ, लाईटस् आदी महागड्या वस्तू प्रवाशांकडून लांबवल्या जात असून ही बाब योग्य नाही, रेल्वे ही प्रवाशांची मालमत्ता आहे, असेही त्यांनी सांगितले.

सौर उर्जा प्रकल्प उभारणार
भुसावळ विभागात रेल्वेच्या लाईनीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेवर सौर उर्जेवर चालणारे प्रकल्प आगामी वर्षात उभारले जातील व त्या माध्यमातून रेल्वेच्या विजेसह खर्चाची मोठी बचत होईल, असे गुप्ता यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी इंदोर-मनमाड-व्हाया मालेगाव मार्गासाठी 4984 करोड, धुळे-नरडाणा मार्गासाठी एक कोटी, ईगतपुरी-मनमाड तिसर्‍या लाईनसाठी 10 कोटी, बडनेर्‍यातील वॅगन दुरुस्तीच्या कारखान्यासाठी 99 कोटी रुपये मंजूर झाल्याचे सांगत यापूर्वीची पिंक बुक पद्धत आता बंद झाली असून अंब्रेला पद्धत्तीने वर्क होत असल्याचे समाधान व्यक्त केले. पत्रकार परीषदेला सिनी.डीसीएम आर.के.शर्मा, वरीष्ठ मंडळ अभियंता समन्वय राजेश चिखले, सहाय्यक वाणिज्य प्रबंधक अजय कुमार, जीवन चौधरी, चेतन फडणीस, प्रमोद साळुंखे आदींची उपस्थिती होती.