मुंबई । संशोधनामध्ये मोठी ताकद आहे. संशोधनामुळे अनेक गोष्टी यशस्वी होतात. लंडनमध्ये विजेवर बस चालते, भारतातही तशी बस चालावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीची बॅटरी शास्त्रज्ञांनी तयार केली असून पुढील वर्षभरामध्ये भारतामध्ये विजेवर चालणारी बस, स्कूटर रस्त्यावर धावेल, असा विश्वास भूपृष्ठ वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा आठवा दीक्षान्त समारंभ गडकरी यांच्या उपस्थितीत पार पडला.
किरणकुमार ‘डॉक्टर ऑफ सायन्स’
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. डी. पाटील, इस्रोचे अध्यक्ष ए. एस. किरणकुमार, हरियाणामधील शिवयोग धामचे अवधूत शिवानंद, माजी मंत्री विनय कोरे यांच्यासह विद्यापीठाच्या विविध विभागांचे प्रमुख या वेळी उपस्थित होते. इस्रोचे अध्यक्ष किरणकुमार यांना विद्यापीठाच्या वतीने ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ या पदवीने सन्मानित करण्यात आले. तर, अवधूत शिवानंद आणि विनय कोरे यांनी यंदाचा डी.लीट हा सन्मान प्रदान करण्यात आला.
7 लाख कोटी रुपयांची इंधन खरेदी
“ज्ञान, तंत्रज्ञानाचे रुपांतर संपत्तीमध्ये केले तरच देश पुढे जाईल. इस्रोने एकाच वेळी 104 उपग्रह अवकाशात सोडण्याचा विक्रम केला. त्यामुळे संशोधनामध्ये मोठी ताकद आहे हे सिद्ध होते. देशाला दरवर्षी 7 लाख कोटी रुपयांचे इंधन खरेदी करावे लागते. हे महागडे आणि प्रदूषण करणारे इंधन आपण वापरतो. त्याऐवजी इथेनॉल वापरले तर फायदा होऊ शकतो. इथेनॉलची निर्मिती केली तर शेतकर्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे देशामध्ये इलेक्ट्रिकल बायोडिझेल, इथेनॉल, मिथेनॉल निर्मितीचे कारखाने उभे राहिले तर शेतकरीच इंधन देऊ शकतो.
बॅटरी पाच लाखांची
नागपूरमध्ये 57 बस बायोडिझेलवर चालतात. यामुळे प्रदूषण कमी होऊन शेतकर्यांनाही त्याचा फायदा होणार आहे. लंडनमध्ये हिंदुजा बंधूंच्या अशोक लेलँड कंपनीची बस विजेवर चालते. त्या बसची किंमत दोन कोटींच्या आसपास आहे. त्या बसला लागणार्या लिथियम बॅटरीची किंमत 55 लाख असल्याचे कळले. इस्रोच्या शास्त्रज्ञांना बॅटरी तयार करायला सांगितले.त्यांनी ती बॅटरी तयार केली असून तिची किंमत फक्त पाच लाख आहे.