देहूरोड । गेल्यावर्षी महाड येथील सावित्री पुल दुर्घटनेमुळे राज्यातील जुने व धोकादायक अवस्थेतील पूलांचा प्रश्न उपस्थित झाला होता. या पर्श्वभूमीवर देहू येथील इंद्रायणी नदीवरील जुन्या पुलाच्या अवस्थेवर पुढारीने प्रकाश टाकला होता. त्याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने हा पूल तत्काळ वाहतुकीसाठी बंद केला होता. मात्र, पावसाळा संपताच पुन्हा त्यावरून वाहतुक सुरू करण्यात आली. वर्षभरानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला पुन्हा जाग आली असुन हा पूल नुकताच पुन्हा एकदा वाहतुकीला बंद करण्यात आला आहे.
वर्ष उलटले तरी स्ट्रक्चरल ऑडिट झाले नाही
मागील वर्षी महाड दुर्घटनेमुळे राज्यातील जुन्या व कलबाह्य झालेल्या पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. अशा सर्व पूलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या पार्श्वभुमीवर देहूच्या पुलाचा मुद्दा उपस्थित करणारे वृत्त जनशक्तीने प्रसिध्द केले होते. त्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने हा पूल वाहतुकीसाठी बंद केला होता. जिल्ह्यात 30 मीटरपेक्षा अधिक लांबी असलेले पूल 81 आहेत. तर त्याहुन कमी लांबी असलेले 753 पूल आहेत. यापैकी सात ब्रिटीशकालीन पूलांसह 25 पूलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना होत्या. या 25 पूलांमध्ये देहुतील इंद्रायणी नदीवरील जुन्या पूलाचाही समावेश होता. मात्र, वर्ष उलटले तरी या पूलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले नाही, असे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
गेल्या वर्षी बंद केला होता पूल
सार्वजनिक बांधकाम विभागाने मगील पावसाळ्यात हा पूल वाहतुकीला बंद केला. मात्र, पावसाळा संपताच पुन्हा त्यावरुन वाहतुक सुरू झाली. वर्षभर ती सुरु होती. यावर्षी जुलैमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे मावळातील आंद्रा, वडिवळे हि धरणे तुडूंब झाली. त्यामुळे धरणांतुन पाणी सोडण्यात आले होते. या काळात देहुत इंद्रायणीची पूरसदृश स्थिती होती. पावसाचा जोर कायम असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने लगबगीने हा पूल वाहतुकीसाठी बंद केला. दरवर्षी पवसाळा आला की, पूल बंद करणार का? असा मिश्कील सवाल ग्रामस्थ विचारू लागले आहेत.