वरणगावात रात्री-अपरात्री होतेय अवैध गौण-खनिजांची वाहतूक
भुसावळ- तालुक्यातील वरणगावातील तलाठी कार्यालयातील तलाठ्याची जागा रीक्त असून या कार्यालयाचा प्रभारी पदभार वर्षभरापासून तळवेल येथील तलाठ्याकडे सोपवण्यात आला असून कार्यालयात कायमस्वरूपी तलाठी नसल्याने वरणगावातील नागरीकांना वेळेवर दाखले व उतारे लवकर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. शिवाय अवैध गौण खनिज वाहतूक करणार्यांवर कारवाई करण्यासाठी कुणीच नसल्याने शहरात रात्री-अपरात्री मोठ्या प्रमाणात गौण खनिजांची वाहतूक केली जात आहे. याकडे महसूल विभागाने लक्ष देण्याची आवश्कता आहे.
नागरीकांचे दाखल्यांसह उतार्यासाठी हाल
तालुक्यातील किमान 50 हजार लोकसंख्येचे शहर असलेल्या वरणगावात बँका व्यतिरीक्त शासकीय कार्यालयांचा तुटवडा आहे तर एकमेव असलेल्या तलाठी कार्यालयाची स्थितीही बिकट आहे. या कार्यालयातील तलाठ्याची जागा रीक्त आहे. यामुळे तळवेल येथील तलाठी पवन नवगाळे यांच्याकडे वर्षभरापासून वरणगाव तलाठी कार्यालयाचा अतिरीक्त पदभार सोपवण्यात आला आहे मात्र एकाच तलाठीला दोन्ही गावांचा कार्यभार सांभाळणे कठीण होत आहे. परीणामी प्रभारी तलाठी यांना वरणगावातील कार्यालयाकडे लक्ष द्यायला फारसा वेळ मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. विविध दाखले व सातबारा उतारे, नोंदी करण्यासाठी तलाठ्यांची प्र.तीक्षा करण्याची वेळ नागरीकांवर आली आहे मात्र महसूल विभागाच्या वरीष्ठ अधिकार्यांचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरीकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. शिवाय दहावी-बारावीच्या निकालानंतर विद्यार्थांना शैक्षणिक कामकाजासाठी विविध दाखल्यांची आवश्यकता भासणार आहे. यासाठी महसूल विभागाने वरणगावातील तलाठी कार्यालयातील रीक्त असलेल्या जागेवर कायमस्वरूपी तलाठ्याची नियुक्ती करणे आवश्यक आहे.
अवैध गौण खनिजाची वाहतूक
अवैधरीत्या गौण खनिजांची वाहतूक करणार्या वाहनधारकांवर महसूल विभागाचा जबाबदार अधिकारी व तलाठी नसल्याने वाहतूकदारांचे चांगलेच फावले आहे. यामुळे रात्री-अपरात्री अवैधरीत्या गौण खनिजांची वाहतूक होते. महसूल विभागाच्या महसूलीवर मोठ्या प्रमाणात परीणाम होत आहे.
काही दिवस यांच्याकडे होता पदभार
वर्षभराच्या सुरूवातील फुलगाव येथील तलाठी विनोद बारी यांच्याकडे वरणगावच्या तलाठी कार्यालयाचा अतिरीक्त पदभार सोपवण्यात आला होता मात्र त्यांची बदली झाल्याने या कार्यालयाचा कारभार तळवेल येथील पवन नवगाळे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे यामुळे वरणगावासायींच्या अडचणीत वाढ निर्माण झाली आहे.
मंडळाधिकारीही प्रभारी
प्रभारी तलाठ्यांप्रमाणेच मंडळाधिकारी यांचीही वरणगावात प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मंडळाधिकारी म्हणून तहसील कार्यालयातील करमणूक कर अधिकारी आर.के.पवार यांच्याकडे अतिरीक्त पदभार सोपवण्यात आला. यामुळे प्रभारी मंडळाधिकारी पवार हे सुद्धा आठवड्यातून केवळ दोन दिवस वरणगावातील तलाठी कार्यालयात हजेरी लावत असल्याने नागरीकांमधून कायमस्वरूपी तलाठी व मंडळाधिकारी यांच्या नियुक्तीची मागणी होत आहे.