वर्षाच्या सुरुवातीलाच सामान्यांना धक्का; सिलिंडरच्या दरात १९ रुपयाने वाढ !

0

नवी दिल्ली : पेट्रोलियम कंपन्यांनी आज नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल १९ रुपयांची वाढ केली आहे. सलग पाचव्या महिन्यात सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली असून सामन्यांसाठी हा नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच लागलेच झटका मानला जात आहे. दिल्लीत १४.२ किलोचा गॅस सिलिंडरचा दर आता ७१४ रुपये झाला आहे. मुंबईत ग्राहकांना घरगुती गॅससाठी ६८४.५० रुपये मोजावे लागतील. मुंबईत गॅस सिलिंडर १९.५० रुपयांनी महागला आहे. घरगुती गॅस सिलिंडरबरोबरच व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या किमतीत ३३ रुपयांची वाढ झाली आहे.

मे-जूनपासून सिलिंडरच्या दरात वाढ होत आहे. चीन आणि अमेरिका यांमधील व्यापारी संघर्षाने जागतिक कमोडीटी बाजारावर परिणाम झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजीच्या किमतींवर परिणाम होत असल्याने पेट्रोलियम कंपन्या एलपीजीच्या किंमतींचा आढावा घेत आहेत. चलन विनिमय दरातील बदल इंधन आयातीच्या खर्चात वाढ करतात. २०१९ मध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयात २.२८ टक्के अवमूल्यन झाले.

सरकारकडून प्रत्येक कुटुंबाला वर्षाकाठी १२ सिलिंडवर अनुदान दिले जाते. मात्र त्यानंतर प्रत्येक सिलिंडर बाजार भावाप्रमाणे खरेदी करावा लागतो. स्वच्छ इंधन वापराला प्रोत्साहन देणाऱ्या केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडर गरिबांना मोठ्या संख्येने वितरित केले आहेत. यामुळे मागील वर्षभरात एलपीजीचा खप ६ टक्क्याने वाढला असून तो २. १८ दशलक्ष टनांपर्यंत वाढला. नुकताच पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ९५ टक्के भारतीय कुटुंबाना गॅस सिलिंडर उपलब्ध होत असल्याचा दावा केला होता. घरगुती गॅस सिलिंडरबरोबरच व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. वाणिज्य वापरासाठीच्या १९ किलोचा गॅस सिलिंडर ३३ रुपयांनी महागला आहे. या दरवाढीने छोट्या व्यावसायिकांना दरवाढीची झळ सोसावी लागले. यामुळे हॉटेल व्यवसायिकांकडून दरवाढ केली जाण्याची शक्यता आहे.