नवी दिल्ली:लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी १२ हजारपेक्षा कमी मासिक उत्पन्न असणाऱ्यांना दरवर्षी ७२ हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यावरून बरीच चर्चा सुरु आहे. हा निर्णय जाहीर करून ४८ तास उलटत नाही तोच ही योजना फक्त महिलांसाठीच असल्याचा खुलासा काँग्रेसने केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही योजना केवळ स्त्रियांपूरतीच मर्यादित असल्याचे सांगतानाच गावांप्रमाणेच शहरातील स्त्रियांनाही त्याचा लाभ मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
देशात गरिबांसाठीच्या अजून २२ टक्के योजना आहेत. मात्र आमच्या योजनेमुळे या योजना निकाली निघतील, असा दावा सुरजेवाला यांनी केला. यावेळी त्यांनी या स्किमला विरोध करणाऱ्या भाजपवर जोरदार टीक केली. श्रीमंतांचं कर्ज माफ करणारेच आज गरिबांच्या योजनेला विरोध करत असून विरोध करणारे ढोंगी आहेत, अशी टीका त्यांनी केली. तसेच १० लाखांचा सूट परिधान करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी गरिबांच्या या योजनेला विरोध का करत आहेत? असा सवालही त्यांनी केला.