वर्षा बंगल्याने थकवले सात लाखांचे बिल

0

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या बंगल्याने ७ लाख ४४ हजार ९८१ रुपयांचे पाणी बिल थकले असल्याचे माहितीच्या अधिकारातून समोर आले आहे. यासोबतच राज्याचे हाय प्रोफाईल मंत्री यांच्या निवासस्थानावर मोठी थकबाकी असल्याचे समोर आले आहे. सामान्य माणसाने जर कुठले बिल भरले नाही तर त्या विभागाकडून नोटीसा देवून ७ दिवसाच्या आत बिल भरायला लावणारे अधिकारी या मंत्राच्या निवासस्थानावर इतकी मेहेरबानी दाखवतात याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई महानगर पालिकेकडून माहितीच्या अधिकारा खाली माहिती मागवली होती त्या माहितीत उघड झाले आहे. ७ लाखांहून अधिक रुपयांचे पाणी बिल थकवलयाने मुंबई मनपा ने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानाला डिफॉल्टरच्या यादीत टाकले आहे.

थकबाकी असणारे मंत्र्यांचे निवासस्थान : देवेंद्र फडणवीस, वर्षा निवासस्थान ७ लाख ४४ हजार ९८१ रुपये. सुधीर मुनगंटीवार, देवगिरी निवासस्थान १ लाख ४५ हजार ५५ रुपये. विनोद तावडे, सेवासदन निवासस्थान १ लाख ६१ हजार ७१९ रुपये पंकजा मुंडे, रॉयलस्टोन निवासस्थान ३५ हजार ०३३ रुपये. दिवाकर रावते, मेघदूत निवासस्थान १ लाख ०५ हजार ४८४ रुपये. सुभाष देसाई, पुरातन निवासस्थान २ लाख ४९ हजार २४३ रुपये. एकनाथ शिंदे, नंदनवन निवासस्थान २ लाख २८ हजार ४२४ रुपये. चंद्रशेखर बावनकुळे, जेतवन निवासस्थान ६ लाख १४ हजार ८५४ रुपये. महादेव जानकर, मुक्तागिरी निवासस्थान १ लाख ७३ हजार ४९७ रुपये. ज्ञानेश्वरी निवासस्थान ५९ हजार ७७८ रुपये. सह्याद्री अतिथीगृह १२ लाख ०४ हजार ३९० रुपये. राज्याच्या हाय प्रोफाईल मंत्र्यांच्या निवासस्थानावर एकूण ३६ लाख, ८१ हजार, ९५८ रुपये थकबाकी असल्याचे समोर आले आहे.