मुंबई – पालिकेच्या के पश्चिम विभागातील वर्सोवा गावठाण परिसरातील 5 अनधिकृत इमारतींवर पालिकेद्वारे निष्कासनाची कारवाई करण्यात असून या इमारती तोडण्यात येत आहेत. तसेच जोगेश्वरी पश्चिम परिसरात स्वामी विवेकानंद मार्गाचा उपमार्ग असणा-या बांदिवली हिल रस्त्याजवळील रेहान टॉवर या इमारतीमध्ये अनधिकृतपणे बांधण्यात आलेली सदनिका के पश्चिम विभागाच्या पथकाद्वारे तोडण्यात आली त्याचबरोबर स्वामी विवेकानंद मार्गालगतच्या कॅप्टन सुरेश सामंत मार्गावरील अतिक्रमणांवर धडक कारवाई करण्यात आली असून ही अतिक्रमणे हटविण्यात येऊन रस्ता मोकळा करण्यात आला आहे. परिमंडळ – 4 चे उपायुक्त किरण आचरेकर यांच्या मार्गदर्शनानुसार के / पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांच्या नेतृत्वात या तिन्ही कारवाया करण्यात आल्या आहेत.
अंधेरी परिसरातील वर्सोवा गावठाणामध्ये वर्सोवा जेट्टीजवळील साधारणपणे 3 हजार चौरस फुटांच्या जागेवर तीन मजली अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. त्याचबरोबर खाडी परिसरालगतच्या व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारित असणा-या सुमारे 8 हजार 500 चौरस फुट जागेवरदेखील 4 ठिकाणी अनधिकृत बांधकामे सुरु होती. यामध्ये व्यवसायिक स्वरुपाच्या बांधकामांचाही समावेश दिसून येत होता. यानुसार 11 हजार 500 चौरस फूट जागेवर उभारण्यात येत असलेली वा उभारलेली 5 अनधिकृत बांधकामे पालिकेच्या पथकाद्वारे तोडण्यात आली आहेत.
जोगेश्वरी पश्चिम परिसरातील स्वामी विवेकानंद मार्गाच्या पश्चिमेचा उप-रस्ता असणा-या बांदिवली हिल मार्गानजीक मिना इंटरनॅशनल हॉटेलच्या जवळ रेहान टॉवर ही इमारत आहे. या इमारतीमध्ये दुस-या मजल्यावर पोडियमच्या जागेत अनधिकृतपणे सुमारे 450 चौरस फुटांची एक सदनिका अनधिकृतपणे बांधण्यात आल्याचे निर्दशनास आले होते. सदर अनधिकृत बांधकामांवर पालिकेच्या के पश्चिम विभागाद्वारे धडक कारवाई करण्यात येऊन ही सदनिका व संबंधित बांधकाम तोडण्यात आले आहे. ही कारवाई करण्यासाठी महापालिकेचे 7 कामगार – कर्मचारी – अधिकारी घटनास्थळी कार्यरत होते. तसेच मुंबई पोलीस दलाच्या 5 कर्मचा-यांचे विशेष सहकार्य या कारवाईसाठी पालिकेच्या विभाग कार्यालयाला लाभले, अशी माहिती सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली आहे.
के पश्चिम विभागातील स्वामी विवेकानंद मार्गालगत पश्चिम बाजूला कॅप्टन सुरेश सामंत मार्ग आहे. हा मार्ग स्वामी विवेकानंद मार्गाला जिथे जोडला असून त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे उद्भवली होती. यामध्ये 8 पक्क्या स्वरुपाच्या आणि 12 कच्च्या स्वरुपाच्या बांधकामांचा समावेश होता. या अतिक्रमणांमुळे हा रस्ता अरुंद झाला होता. ज्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी होण्यासोबतच पादचा-यांना देखील चालताना अडचणींचा सामना करावा लागत होता. के पश्चिम विभागाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाद्वारे ही सर्व अतिक्रमणे नुकत्याच करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान हटविण्यात आली आहेत. या कार्यवाहीसाठी 1 जेसीबी यंत्र व इतर आवश्यक साधनसामुग्री वापरण्यात आली. ही कारवाई यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महापालिकेचे 10 कामगार – कर्मचारी – अधिकारी कार्यरत होते. ही अतिक्रमणे हटविल्यानंतर मोकळ्या झालेल्या रस्त्यावर पालिकेच्या रस्ते खात्याद्वारे रस्ता, पदपथ आदी सुविधा तयार करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरु झाली आहे, अशीही माहिती गायकवाड यांनी दिली आहे.