मुंबई । पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते आणि प्रख्यात वकील अफरोज शाह यांच्या नेतृत्वाखालील ‘वर्सोवा किनारा स्वच्छता मोहिमेला संयुक्त राष्ट्रांनी जगातील सर्वात मोठ्या समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेचा दर्जा दिला आहे. या मोहिमेदरम्यान अफरोज शाह यांना सहकार्य करण्याकरिता देशातील प्लास्टिक उद्योग क्षेत्रातील शिखर संघटना प्लास्ट इंडिया फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. या मोहिमेसाठी प्रसिद्ध अभिनेते बिग बी अमिताभ बच्चन यांनी एक एक्सकेव्हेटर आणि ट्रॅक्टर दिला आहे. या उपकरणांच्या हाताळणीचे काम प्लास्ट इंडिया फाऊंडेशन एक वर्षाकरिता करणार आहे.
प्लास्ट इंडिया फाऊंडेशनने बीइंग ओशियन फाऊंडेशनच्या सहकार्याने ही मोहीम हाती घेतली आहे. गेले 137 आठवडे ही संस्था समुद्रकिनार्यावरील प्लास्टिक हटवण्याचे काम करत असून, 13 दशलक्ष किलो प्लास्टिक आणि कचरा स्वच्छ केला आहे. प्लास्ट इंडिया समुद्रकिनारे स्वच्छ करण्यासाठी काम करणारे नागरिक, एमसीजीएम आणि स्वयंसेवकांना मदत करण्यासाठी कटिबद्ध आहे. प्लास्ट इंडिया फाऊंडेशनचे अध्यक्ष के. के. सेकसरीया म्हणाले, ‘प्लास्ट इंडिया फाऊंडेशन’ला या मोहिमेसाठी आवश्यक असलेल्या एक्सकेव्हेटर आणि ट्रॅक्टरची देखभाल आणि मोहिमेच्या खर्चासाठी हातभार लावण्याची संधी मिळाली आहे, याचा आम्हाला आनंद आहे.
जागरूकता निर्माण करणे उद्देश
पाण्यामध्ये कोणत्याही प्रकारचे अस्वच्छ पाणी, कचरा, प्लास्टिक टाकू नये यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा आमचा उद्देश आहे. वर्सोवा किनार्याची मोहीम यशस्वी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण याच प्रकारची मोहीम अन्य किनार्यांवर राबवता येईल. नागरिकांचा यात सक्रिय सहभाग असला, तरच हे शक्य होऊ शकते, तरच देश स्वच्छ होऊ शकेल. आमचा साधा, सरळ संदेश आहे, समुद्रकिनार्यावर कचरा फेकू नका, किनारे अधिक सुंदर बनवा, देशाच्या प्रगतीला हातभार लावा.’