वर्सोवा बीच समुद्रकिनार्‍याच्या स्वच्छतेला पुन्हा होणार सुरुवात

0

मुंबई । वर्सोवा बीचची बंद पडलेली स्वच्छता मोहीम 2 डिसेंबरपासून पुन्हा सुरू होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. 19 डिसेंबरपासून बंद पडलेली ही मोहीम आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत 2 डिसेंबरपासून पुन्हा सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून खास मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे वर्सोवा बीचला भेट देणार आहेत. त्यामुळे या मोहिमेचे जनक डॉ. अफरोझ शाह वर्सोवा बीच स्वच्छता मोहीम येत्या शनिवारपासून पुन्हा सुरू करणार असल्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. येथील साचलेला कचरा लवकर उचलण्यासाठी खास मुख्यमंत्री फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेऊन अफरोझ शाहला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले.

सुमारे 85 ट्रक कचरा उचलला
आतापर्यंत येथील सुमारे 85 ट्रक कचरा उचलण्यात आला आहे. येत्या बुधवारपर्यंत सर्व कचरा उचलला जाऊन वर्सोवा बीच चकाचक होईल, अशी माहिती डॉ. लव्हेकर यांनी दिली. येत्या शनिवारपासून येथील स्वच्छता पुन्हा सुरू करण्याचा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे, अशी माहिती वेसावे कोळीवाड्यातील प्रवीण भावे, राजहंस ठपके यांनी दिली.

गेल्या सोमवारपासून येथील कचरा उचलण्यास जोमाने सुरुवात झाली होती. आता गेल्या सोमवारपासून आजपर्यंत जवळ जवळ येथील 75 टक्के कचरा उचलण्यात आला आहे. गेले सहा महिने वर्सोवा बीचवर साचलेला कचरा पालिकेच्या के-पश्‍चिम विभागातर्फे उचलत नसल्यामुळे 15 ऑक्टोबर 2015 पासून वर्सोवा रेसिडेंट व्हॉलेंटीयर्स(व्हीआरव्ही) व वेसावा कोळी जमात यांच्या संयुक्त विद्यमाने 109 आठवडे राबवलेल्या या मोहिमेचे जनक अफरोझ शाह यांनी हताश होऊन ट्वीट करून बंद केल्याचे जाहीर केले होते. वर्सोव्याचे स्थानिक आमदार डॉ. लव्हेकर व के पश्‍चिम विभागाचे प्रभाग समिती अध्यक्ष योगिराज दभाडकर यांनी जातीने लक्ष घालून आणि के पश्‍चिम विभागाचे सहाय्यक पालिका आयुक्त प्रशांत गायकवाड आणि अफरोझ शाह यांच्या बरोबर सतत बैठका घेऊन आणि बीचवरील कचरा लवकर उचलण्यासाठी खास पुढाकार घेतला होता.