वलठाण येथील बालवाडी बांधकामाच्या चौकशीची मागणी

0

चाळीसगाव। तालुक्यातील मौजे वलठाणे पाटे येथे मोडकळीस आलेल्या बालवाडीच्या इमारतीचे बांधकामाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (अ) यांनी गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले. मौजे वलठाण पाटे येथील अंगणवाडी बालवाडीचे वर्ग भरत असलेली इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असून भिंतींना मोठमोठे तडे पडले आहेत.

इमारतीत 3 ते 7 वयोगटातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात. अंगणवाडी व बालवाडीच्या इमारतीच्या भिंतीला तडे गेल्याने ती कधीही केव्हाही कोसळून मोठा अपघात होऊन त्यात निष्पाप बालकांचा जीव जाऊ शकतो. अशा धोकादायक इमारतीतील बालवाडी व अंगणवाडी सुरु करण्याची परवानगी कोणाकडून घेतली व कधीपासून बालवाडी, अंगणवाडी सुरु करण्यात आली याची चौकशी करण्यात यावी. याबाबत जातीने लक्ष घालून संबंधितांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. सदर कामास आपणाकडून दिरंगाई अथवा टाळाटाळ झाल्यास ग्रामस्थांसह कार्यकर्ते पंचायत समिती कार्यालयासमोर येत्या 15 ऑगस्ट रोजी आमरण उपोषणास बसणार आहे.