वलवण गावातील रस्त्याची बांधकाम विभागाने लावली वाट

0

नूतनीकरणाच्या नावाखाली केवळ मोठी खडी व डांबराचे पाणी टाकले; अनेक दुचाकीस्वार झाले जखमी

लोणावळा : सरकारी कामातील अनागोंदी कारभार सार्वजनिक बांधकाम विभागात प्रखरतेने पहायला मिळतो. मागील पंधरा दिवसापूर्वी वलवण गावातून जाणार्‍या जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गाचे नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले. प्रत्यक्षात मात्र रस्ता डांबरीकरण करण्याऐवजी केवळ मोठी खडी रस्त्यावर टाकत त्यावर डांबराचे पाणी टाकून नागरिकांची फसवणूक करण्यात आली आहे.

डिसेंबर महिन्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्लुडी) मनशक्ती केंद्र ते द्रुतगती पुलाच्या रस्त्याचे काम हाती घेतल. मात्र अवघ्या तीन दिवसांत सर्व नियम पायदळी तुडवत पूर्वीच्या डांबरी रस्त्यावर मोठी खडी पांगवत त्यावर डांबर पाणी मारून काम संपवले. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. अनेक दुचाकीस्वार वाहने घसरून पडल्याने जखमी झाले. ठेकेदाराने कामात मोठा घोटाळा केला आहे. नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन झाले होते. या निकृष्ट कामामुळे नगराध्यक्षा व मावळचे आमदार बाळा भेगडे यांच्या नावाने खडे फोडू लागले आहेत. लोकप्रतिनिधीनी याची तातडीने दखल घेत ठेकेदारावर कारवाई करत त्याला काळी यादीत टाकावे अशी मागणी नागरिक करत आहेत.