वलवण धरण पर्यटकांसाठी खुले करा

0

लोणावळा : सुरक्षिततेच्या कारणास्तव पर्यटकांना प्रवेश बंद करण्यात आलेले वलवण धरण पुन्हा पर्यटकांसाठी खुले करावे, अशी आग्रही मागणी लोणावळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी टाटा कंपनीच्या प्रशासनाकडे केली आहे. या विषयासंदर्भात त्यांनी टाटा कंपनी प्रशासनाला निवेदनदेखील दिले आहे.

लोणावळा प्रसिद्ध पर्यटनस्थळ
लोणावळा हे राज्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असून, राज्यभरातून तसेच परराज्यांमधून मोठ्या संख्येने पर्यटक लोणावळ्याला भेट देतात. टाटा कंपनीचे वलवण धरण व उद्यान पूर्वी पर्यटकांसाठी खुले होते. मात्र, मागील काही वर्षांपासून सुरक्षिततेच्या कारणास्तव टाटा कंपनीने अचानक हे धरण व उद्यान पर्यटकांसाठी बंद केले असून, त्या परिसरात जाण्यास सर्वांनाच बंदी घालण्यात आली आहे.

…अन्यथा टाटा कंपनीविरुद्ध आंदोलन
यांसदर्भात सुरेखा जाधव म्हणाल्या की, याबाबत आम्ही लोणावळा शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला आहे. त्यांनी टाटा कंपनीला धरण बंद करण्याबाबत कसल्याही सूचना दिल्या नसल्याचे सांगितले. असे असताना टाटा कंपनी जाणीवपूर्वक सुरक्षेचा मुद्दा पुढे करत पर्यटकांना या पर्यटनस्थळांवर जाण्यास मज्जाव करत आहे. टाटा कंपनीने हे आडमुठेपणाचे धोरण तातडीने सोडावे आणि धरण परिसरात फिरण्यास पर्यटकांना परवानगी द्यावी. अन्यथा मावळचे आमदार बाळा भेगडे यांच्या नेतृत्त्वाखाली टाटा कंपनीच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नगराध्यक्षा जाधव यांनी दिला आहे.