वल्गना पुर्‍या; कृती करा!

0

सोमवारी रात्री जम्मू-काश्मीरमधील बालटाहून जम्मूकडे परतणार्‍या अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात 10 यात्रेकरू ठार झाले आहेत. बसच्या चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने मोठा अनर्थ टळला. दहशतवाद्यांना या बसचे अपहरण करायचे होते. सलीम नावाच्या चालकाने 50 प्रवाशांचे जीव वाचवले. परंतु, असा भीषण प्रसंग यात्रेकरूंवर ओढावलाच कसा? हा मूळ मुद्दा आहे. अमरनाथ यात्रेच्या मार्गावर पावलोपावली शस्त्रधारी जवान तैनात असतात. सर्व यात्रेकरूंना मार्गस्थ करून बंदोबस्त सायंकाळी 7.30 वाजता काढून घेतला जातो. मात्र, बसचा टायर पंक्चर झाल्याने एक बस मागे राहिली आणि तिच्या सुरक्षेकडे कुणीही लक्ष दिले नाही. म्हणूनच, दहशतवाद्यांचे फावले. खोर्‍यात सुरक्षेचा प्रश्‍न गंभीर असताना यात्रेकरूंची बस अशी वार्‍यावर का सोडण्यात आली? त्यामुळेच हा हल्ला संशयास्पद वाटतो. विशेष म्हणजे, बसवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्यांनी प्रथम बोटेंगू येथे पोलिसांच्या बंकरवर गोळीबार केला. पण, बंकर बुलेटप्रूफ असल्याने दहशतवादी पुढे गेले. त्यानंतर दहशतवाद्यांनी खानबल येथे पोलीस दलाच्या तुकडीवर हल्ला केला. तेथे पोलिसांनी प्रत्युत्तर दिल्याने त्यांना पळ काढावा लागला. वेळीच त्यांना रोखले असते तर कदाचित यात्रेकरूंचा रक्तपात टळला असता. खोर्‍यात दहशतवाद्यांचा खुलेआम धिंगाणा सुरू असताना यात्रेकरूंची बस विनासंरक्षण सोडण्यात आली कशी? आता तर असेही समजते की, गुजरातहून आलेल्या या यात्रेकरूंची नोंदणीही करण्यात आलेली नव्हती, ही अतिशय गंभीर बाब आहे.

चाळीस दिवस चालणार्‍या या यात्रेच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त  असतो. प्रत्येक यात्रेकरू सुरक्षित राहील, असा दावा सुरक्षा यंत्रणांनी यापूर्वीच केला होता. यावर्षी तर केंद्र सरकारने अतिरिक्त सुरक्षा दलांनाही अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी तैनात केलेले आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा दलांनी सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन, बुलेटप्रूफ मोबाइल बंकर, असे साहित्य पुरवले गेले आहे. असे असतानाही दहशतवादी अगदी सहज यात्रेकरूंच्या बसला टार्गेट कसे करू शकतात? या हल्ल्यानंतर यात्रेकरूंमध्ये मोठ्याप्रमाणात दहशतीचे वातावरण आहे. अनेक भाविकांनी यात्रा अर्धवट सोडून घरचा रस्ता धरला. दहशतवादी नागरिकांवर गोळीबार करतात. काश्मीरची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे, पुढील काही काळ अशीच स्थिती राहिल्यास या राज्याची अर्थव्यवस्था खिळखिळी होऊ शकते. काश्मीर खोरे निरपराधांच्या रक्ताने माखले जात असताना सरकार केवळ गप्पा मारण्यातच दंग आहे का?

अमरनाथ यात्रेकरूंवर हल्ला करायचा नाही, असा दहशतवाद्यांचा अलिखित नियम होता आणि तो मागील 17 वर्षांपासून पाळला जात होता. यावेळेस मात्र त्यांनी हा नियम मोडला व अमरनाथ यात्रेकरूंना लक्ष्य केले. यामागे नक्की काय कारण आहे, याचा शोध गुप्तचर यंत्रणांनी घेणे आवश्यक आहे. मागीलवर्षी 8 जुलै रोजी खात्मा करण्यात आलेला दहशतवादी बुरहान वाणी यानेदेखील अमरनाथ यात्रेकरूंवर आम्ही हल्ला करणार नाही, असे सांगणारा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता, तर दुसरीकडे यात्रेकरूंच्या बसवरील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी अजूनही कुठल्या दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही. त्यामुळे या रक्तपाताकडे संशयाने बघितले जात आहे. निरपराधांचे मारेकरी कोण? असा प्रश्‍न सतावतो आहे. पोलीस यंत्रणाच एका दहशतवादी संघटनेचे नाव घेऊन संशय व्यक्त करत आहे. अशा प्रकारचा हल्ला झाल्यानंतर दहशतवादी संघटना जबाबदारी स्वीकारत असतात. या हल्ल्यानंतर अद्याप तरी असे काही घडलेले नाही. 2000 साली दहशतवाद्यांनी पहेलगाम येथे हल्ला केला होता. यामध्ये 30 यात्रेकरू ठार झाले होते, तर 60 पेक्षा जास्त गंभीर जखमी झाले होते. त्यावेळी केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार होते. आता पुन्हा 17 वर्षांनी दहशतवाद्यांनी मोदी सरकारच्या काळात अमरनाथ यात्रेकरूंवर हल्ला केला आहे. मार्च 2015पासून भाजपचे सरकार आल्यानंतर जम्मूकाश्मीरमध्ये 48 नागरिक मारले गेले, तर 134 जवान शहीद झाले आहेत. शिवाय, काश्मीर खोर्‍यात भडकलेल्या असंतोषात आतापर्यंत 100 जणांचा बळी गेला आहे. फुटीरतावाद्यांनी पुन्हा डोके वर काढले असताना काश्मीर खोर्‍यातील ही अशांतता नजरेआड करून चालणारी नाही. पाकिस्तानच्या कारवायाही दिवसेंदिवस वाढत आहेत. ही परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकारचे अपयश असल्याचेच जाणवते. त्यापेक्षाही गंभीर म्हणजे पेटलेला काश्मीरप्रश्‍न; काही घडलेच नाही अशा पद्धतीने दुर्लक्षित केला जात आहे. एका सर्जिकल स्ट्राइकचे भांडवल किती दिवस करत बसणार? पाकने अनेकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. आता तरी मोदी सरकार खंबीर भूमिका घेणार का? देशात बंधुभाव वाढवण्यातही हे सरकार अपयशी ठरले आहे. देशाच्या कानाकोपर्‍यात सध्या मुस्लीम व अल्पसंख्याकांचे मोर्चे निघत आहेत. त्याकडेही मोदी सरकार दुर्लक्ष करत आहे. दहशतवाद्यांचा बीमोड करणे आणि देशातील बंधुभाव अबाधित ठेवणे, अशा दोन पातळींवर सक्षमपणे काम करण्याची नितांत आवश्यता आहे. 56 इंची छाती आणि सर्जिकल स्ट्राइकचे भांडवल पुरे; आता गरज आहे ती ठोस कृतीची!