वळण रस्त्यांवर धोक्याचा इशारा देणारे फलक लावा

0

शहादा। तालुक्यातील ठिकठिकाण वळण रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने धोक्याचा इशारा देणारे फलक लावावेत अशी मागणी वाहनधारकांनी केली आहेअपघाती वळण रस्त्यांवर समोरचे येणारे वाहन दिसत नाही त्यामुळे सातत्याने अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकांना आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे. त्या आधारावर सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ गतिरोधक न करता अपघाती वळण आहे ,वाहने हळु चालवा असे फलक लावणे गरजेचे आहे. गेल्या वर्षेभरात वळण रस्त्यांवरच जास्त अपघात झाले आहेत.

वारंवार तक्रार देऊनही फलक लावण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
ग्रामीण भागातील लोकांनी वेळोवेळी तक्रार करुन देखील त्याची दखल घेण्यात आली नाही. शहादा शिरपूर रस्त्यावर कोठली गावाजवळ मोठे अपघाती वळण आहे. समोरून येणारी वाहने एकमेकांना दिसत नाही. गेल्या तीन महिन्यात सहा अपघात याच वळणावर झाले. सहाजणांना आपला प्राण गमवावा लागला. शेवटी ग्रामस्थांनी आंदोलन केले तेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूला गतिरोधक बसविण्यात आले. पण अपघाती नावाचे फलक लावण्यात आलेले नाही. गतिरोधकांपेक्षा धोक्याचा इशारा देणारे फलक आवश्यक आहे. तिच परीस्थिती शहादा खेतीया सुसरी धरणाजवळ सर्वात मोठा वळण रस्ता आहे. पण तेथेही फलक नाही. या वळणावर सातत्याने अपघात होतात. अनरद गावाजवळ वळण रस्ता आहे.

बांधकाम विभागाने फलक न लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी
सारंगखेडा गावाला लागून कुर्‍हावदकडे जाणार्‍या रस्त्याला लागून वळण रस्ता आहे. याठिकाणी नेहमी अपघात होतात. वाळूने भरलेल्या ट्रका डंपर सातत्याने ये जा करतात मात्र फलक लावण्यात आलेले नाही. पाडळद्याकडे जाणार्‍या रस्त्यावर तिखोरा गावाजवळ चार रस्ते आहेत. पण बांधकाम विभागाने कोणत्याही प्रकारचे फलक लावलेले नाही. या चार रस्त्यावर उसाने भरलेल्या वाहनाने बरेच अपघात झाले आहेत. म्हणून बांधकाम विभागाने जिथे आवश्यक आहे तेथे धोक्याचा इशारा देणारे फलक लावावेत अशी मागणी आहे.