धुळे । शुक्रवारी सायंकाळी अचानक झालेल्या जोरदार वार्यासह वळवाच्या पावसाने धुळे शहर- परिसरात अतोनात नुकसान केले. सुमारे अर्धातास जोरदार वादळ आणि तुफानी पावसाने तालुकाभर धुमाकूळ घातला. ह्या वादळात असंख्य घरांचे पत्रे पतंगासारखे उडाले. मोठमोठे महाकाय जुनाट वृक्षही मुळासकट कोसळले. काही ठिकाणी मोठ्या फांद्याही तुटल्या, विजेचे पोल देखील वाकले. त्यामुळे मोठी झाडे वीज तारांवरच कोसळल्याने वीज प्रवाह खंडीत झाला. ह्या वादळी पावसामुळे धुळे शहर व परिसर सायंकाळी 6 वाजेपासून रात्री 12 वाजेपावेतो अंधरातच गडप झाला. त्यामुळे जनजीवन कोलमडले होते. रस्ते वाहतूक रखडली, प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. वीज कर्मचार्यांनी जीवाचे रान करुन 5/6 तासात वीज पुरवठा सुरु केला. तरीही कित्येक भाग अंधारातच राहिले.
जलयुक्तचा घेतला आढावा
मंत्री डॉ. भामरे यांनी सांगितले, अवकाळी पावसामुळे किती नुकसान झाले याचा आढावा घेण्यास संबंधित विभागाच्या अधिकार्यांना सूचना दिलेल्या आहेत. याबाबत संबंधित अधिकार्यांनी तत्काळ कार्यवाही करीत अहवाल सादर करावा. त्यानंतर मोहाडी येथे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामाचे उदघाटन मंत्री डॉ. भामरे यांच्या हस्ते झाले. त्यांनी सांगितले, जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून शेतकर्यांना शाश्वत जलसाठा उपलब्ध होईल. या अभियानाचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. शाश्वत शेतीसाठी जलयुक्त शिवारअभियान उपयुक्त असून या उपक्रमाची देशभरात प्रशंसा झाली आहे. अनुकरणीय असा हा उपक्रम आहे. यावेळी मंत्री डॉ. भामरे यांनी जिल्हा परिषद शाळेतील डिजिटल क्लासरुमची पाहणी करुन समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, संपूर्ण जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या डिजिटल शाळा झाल्या आहेत. यावेळी मंत्री डॉ. भामरे यांनी ग्रामपंचायत कार्यालयास भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला.
ना. भामरे यांनी केली पाहणी
या पावसामुळे धुळे तालुक्यातील अनेक खेड्यापाड्यातही मोठे नुकसान झाले. केळी, पपई, आंबा, डाळींब, शेतपिके, खळवाडी, गोठे, गुरांचेही नुकसान झाले. बहराला आलेले कैरी-आंबा फळ, पपई-डाळींब, केळी, भाजीपाला सारेच उध्वस्त झाले आहे. धुळे तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत, असे निर्देश केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिले आहेत. धुळे तालुक्यात शुक्रवारी अवकाळी पाऊस झाला होता. त्यानंतर मंत्री डॉ. भामरे यांनी धुळे तालुक्यातील वरखेडी, आर्णी, नावरा- नावरी, मोहाडी प्र. डांगरी, नवलनगर परिसरात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची तसेच जलयुक्त शिवार अभियानाची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ, तहसीलदार अमोल मोरे, बबन चौधरी, प्रा. अरविंद जाधव, माजी मंत्री विजय नवल पाटील, बापू खलाणे यांच्यासह शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.