ठाणे : ठाण्याला मोठे करण्याचे काम कै. आनंद दिघे यांच्यासह वसंत डावखरे यांनी केले. डावखरे हे ठाण्याचे वैभव होते. त्यांच्या नावाशिवाय ठाण्याचे नाव पूर्ण होऊ शकत नाही,अशा शब्दांत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वसंतराव डावखरे यांना आदरांजली अर्पण केली.ठाण्याच्या टीपटॉप प्लाझा येथे आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, माजी मंत्री गणेश नाईक, आ. जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे, माजी सनदी अधिकारी नंदकुमार जंत्रे, व इतर राजकीय नेते उपस्थित होते.
माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांनी, हा आघात आपल्या सगळ्यांवर झाला आहे,विरोधी पक्षातील विरोधकांना त्यानी कधीच शत्रू समजले नाही.नाट्य,सिने,कवी लेखक,पत्रकार,राजकीय सर्वच क्षेत्रात ऋणानुबंध, सर्व समाजासोबतच कुटुंबाला संस्कार दिले, अशा शब्दांत आदरांजली अर्पण केली. शेकापचे नेते जयंत पाटील म्हणाले की, ग्रामीण भागातून आलेली व्यक्ती ठाण्यातून महाराष्ट्राच्या राजकारणात आली. आणि त्या व्यक्तीने सबंध महाराष्ट्राला आपलेसे केले. विधान परिषदेच्या सभागृहात त्यांच्यामुळे चैतन्य पसरलेले असायचे. त्यांनी सभागृहात घेतलेले निर्णय जनतेसाठी हितकारी ठरले आहेत. बाळासाहेब देसाईंच्या सान्निध्यात ते वाढले होते. त्यामुळेच त्यांचे चेंबर सर्व राजकीय पुढाऱ्यांचा अड्डा असायचा.आता त्यांची कमतरता पदोपदी जाणवेल.यावेळी संदीप लेले, मनोज शिंदे, चहा, कृपाशंकर सिंह, खा. कपिल पाटील यांनीही आदरांजली अर्पण केली.