भाजपमध्ये राजीनामा नाट्य सुरूच
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपमधील राजीनामा नाट्य काही केल्या संपत नाही. मंगळवारी नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी भाजपपासून फारकत घेतली. तर, आता भाजपचे प्रभाग क्रमांक दोन जाधववाडीचे नगरसेवक वसंत बोराटे यांनीही ‘विधी’ समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. महापौर नितीन काळजे यांनी जाधव यांचा राजीनामा मंजूर देखील केला आहे. महापालिकेत भाजप सत्तेत येऊन नुकतेच एक वर्ष झाले. या वर्षभरात भाजपच्या पदाधिकार्यांनी कोणतीच विकासाची गोष्ट केली नाही. विकासकामांडे दुर्लक्ष करून फक्त पदासाठी राजकारण सुरू आहे. त्यामुळे सतत कोणी ना कोणी पदाधिकारी राजीनामा देत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून राजीनामा सत्र सुरुच आहे. सर्वप्रथम नगरसेवक शीतल शिंदे यांनी विधी समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर स्थायी समिती अध्यक्षपदासाठी राहुल जाधव यांना डावलण्यात आल्यामुळे महापौर नितीन काळजे, स्वत: जाधव, क्रीडा समितीचे सभापती लक्ष्मण सस्ते यांनी राजीनामे दिले होते. शिंदे यांनी देखील स्थायी समिती अध्यक्षपदासाठी डावलल्याचे कारण देत स्थायी सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
त्यानंतर नुकत्याच झालेल्या विषय समिती सदस्यांच्या निवडीतही राजीनाम्यांचे सत्र सुरू राहिले. विधी समिती मागितली असताना क्रीडा समिती दिल्याचा आरोप करत भाजप नगरसेविका अश्विनी बोबडे यांनी नियुक्तीनंतर पाच मिनिटात राजीनामा देवू केला. पात्र असूनही निष्ठावान नगरसेवकांना डावलले जात आहे, आयारामांना पायघड्या घातल्या जात असल्याचा, आरोपही त्यांनी केला होता. आता भाजपचे नगरसेवक वसंत बोराटे यांनी विधी समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तीक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे, त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांचा राजीनामा महापौर नितीन काळजे यांनी मंजुर देखील केला आहे.