विरार । काहीसा दडी मारून बसलेल्या पावसाने शनिवार दुपारपर्यंत वसईत जोरदार बरसायला सुरवात केली. शनिवारी दुपारनंतर विश्रांती घेतलेल्या पावसाने रविवारच्या भल्या पहाटेपासून धुंवाधार बरसायला सुरवात केली. सकाळपासून संततधार बरसणार्या पावसाची या मोसमातील हीच जोरदार वृष्टी असल्याचे नागरिक सांगत आहेत. संततधार पावसामुळे वसई पूर्वे ग्रामीण भागातील सखल भागात पाणी साचले होते. तर नेहमी प्रमाणे कमी उंची असलेला उसगाव भाताणे मार्गावरील पांढरतारा पूल पाण्याखाली गेला असल्याने पलीकडील 10 गावे व 27 पाड्यां वस्त्यांचा या मार्गावरील संपर्क तुटला होता.
नदीच्या किनारपट्टीवरील भातशेती पाण्याखाली
रस्त्यावर देखील पाणी वाहत असून वाहने पाण्यातून वाट काढत पुढे जात होती. तर खेड्यापाड्यात राहणार्यांच्या पायवाटेवर पाणीच पाणी साचले होते. यामुळे दैनंदिन गरजेच्या वस्तूंसाठी किराणा दुकानात जाणार्याना गुढगाभर पाण्यातून वाट काढत जावे लागत होते. भागातील डोंगर दर्या, नद्या नाले तुडुंब भरून वाहत असून दुथडी भरून वाहणार्या तानसा नदीच्या किनारपट्टीवरील भातशेती पाण्याखाली गेली होती.