खानिवडे: आगामी येणाऱ्या खरीप हंगामातील भात लागवडीसाठी वसईतील शेतकऱ्यांनी पाड्व्याच्या मुहूर्तावर आपापल्या शेतात राब जाळून सुरवात केली. दर साल भात पिक घेणारे शेतकरी जंगलातील पाला पाचोळा ,सुकलेले शेण ,भात कापणी नंतर शेतात राहणारे भाताचे चूड व सुकलेल्या काड्या यांचा राब बनवून पाडव्याला जाळतात . भात लागवडीसाठी पेरणी करून रोप बनवण्यासाठी खास राखून ठेवलेल्या जमिनीच्या जागेत असे राब तयार करून जाळले जातात . राब जाळल्यामुळे राबाच्या आगीच्या दाहाने पेरणीच्या जमिनीतील नको असलेल्या गवताचे बी जळून जाते . त्यामुळे तेथे जास्त प्रमाणात फक्त भाताचे रोपच उगवते . तर राबाच्या राखेने तयार होणारे भाताचे रोप हे निरोगी उगवते त्यामुळे भात उत्पादन चांगले येऊन आणेवारी वाढते . याचबरोबर खरीप पिकांच्या तयारीची सुरवात मुहूर्त म्हणून पाडव्यापासून राब जाळणीने सुरु करावयाची असते असे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे .त्यामुळे येथील ग्रामीण भागात जागोजागी शेतकरी राब जाळताना दिसत होते त्यामुळे दूर पर्यंत धुराचे लोट दिसत होते