खानिवडे : वसई तालुक्यातील अनेक राम मंदिरांमध्ये श्री रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.रामनवमी उत्सवानिमित्त मंदिरांमध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच मंदिरांमध्ये भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. महाआरती, अभिषेक, प्रसाद, कीर्तन, भजन असे विविध कार्यक्रम दिवसभर सुरू होते. हजारो रामभक्तांनी राम मंदिरांमध्ये दिवसभरात रामाचे दर्शन घेतले. अनेक मंदिरांत आकर्षक रांगोळ्या व फुलांची सजावट करण्यात आली होती. १५३ वर्षांची परंपरा सांभाळत खानिवडे गावात मंदिर नवनिर्मितीचे काम चालू असलेल्या वास्तूमध्ये हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्रीराम जन्मोत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरा करण्यात आला . ह . भ . प. विजय दळवी यांनी सुश्राव्य कीर्तनाने श्रीराम नामाचा गजर करत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले . खानिवडे श्रीराम जन्मोत्सवात प्रभू रामाची पालखी दारासमोरून येत असल्याने संपूर्ण गावात स्वच्छता करण्याची व गल्लोनगल्ली नऊ दिवस गुढ्या तोरणे उभारून रामरक्षा पठणाची वर्षानुवर्षांची परंपरा आहे .तसेच परिसरातील २५ हुन अधिक गावातील लोक या दिवशी उपवास धरून पालखी चालू झाल्याशिवाय अन्न प्राशन करत नाहीत .
नाळा येथील पुरातन राममंदिरात ह.भ.प.श्री.प्रशांतबुवा विनायक घाटे यांचे सुश्राव्य किर्तन पार पडले.यावेळी हजारो भाविकांनी रामजन्मोत्सवाच्या किर्तनाचा आनंद घेतला.दुपारी ‘तुम्ही राम आठवा… थोडं पुण्य साठवा’ असे सूर आळवत तर ‘दोन प्रहरिं कां ग शिरीं सूर्य थांबला ? राम जन्मला ग सखी राम जन्मला’ म्हणत महिलांनी पाळणा जोजावला.त्यानंतर प्रभूरामाचा जयजयकार करण्यात आला. कीर्तन, महाप्रसाद, भजन, पालखी सोहळा अशा धार्मीक कार्यक्रमांची दिवसभर रेलचेल होती.
विरारजवळील बोळींज येथील श्रीराम मंदिरात भक्तांची गर्दी होती.वसई पापडी येथे जुन्या राम मंदिरामध्ये, अर्नाळा गावातील कोळीवाडा येथील राम मंदिरात,आगाशी चाळपेठ नाक्यावरील हनुमान मंदिरातही शेकडो भक्तांनी दर्शन घेतले. विरार डोंगरपाडा येथील राम मंदिरातही रामनवमी उत्सव साजरा झाला. नालासापोरा पश्चिमेला चक्रेश्वर तलावजवळील मंदिर, माणिकपूर येथील राम-हनुमान मंदिर, कळंब गावातील मंदिर तसेच रानगांव येथील रामाच्या मंदिरात हजारोंच्या संख्येने भक्तांनी रामाचे दर्शन घेतले.एकंदरीत तालुक्यात रामनवमी मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात उत्साहाने साजरी करण्यात आली .