विरार । मागील आठवड्यात जोरदार पावसामुळे वसईतील परिस्थिती पूरसदृश्य बनली होती. ग्रामीण वसईतील सखल भागात जिकडे तिकडे पाणी साठले होते. नद्या नाले ओसंडून वाहत होते, तर शेतीमध्येही पाणीच पाणी येऊन पिके बुडाली होती. यामुळे पाण्याच्या ओघाने मुख्य नदीतील लहान मोठे मासेही पाणी आलेल्या भागात चढले होते. आता पाणी पूर्णपणे ओसरले असले, तरी ओहोळ, नाले व उपनद्यांचा प्रवाह समुद्राच्या दिशेने प्रवाहित होत आहे. या प्रवाहांवर भागातील मासेमारी करणार्या शेतकर्यांनी कृत्रिम बांध घालून बांधाच्या वरून पाणी ओसंडून वाहू लागेल, अशी व्यवस्था केली आहे.
शेती लागवडीनंतर एक रोजगार म्हणून शेतकरी करतात मासेमारी
किवाच्या ताज्या माशांचा खास खवय्या वर्ग असून चांगली मागणीही आहे. त्यामुळे शेती लागवडीनंतर एक रोजगार म्हणून शेतकरी ही मासेमारी करत असून चांगला रोजगार मिळवत आहेत. वसई तालुक्यातील ग्रामीण भागात नदीच्या मुख्य ओहळात शेतातून वाहत जाणारे पाणी बांध बांधून अडवून बांधाच्या मध्यावर पाण्याचा प्रवाह सोडून बांबू, सागाची पाने, दगड व लाकडाचे कीव बनवून बांबूच्या साट्यावर जाळी ठेवून पारंपरिक पद्धतीने मासेमारी केली जाते. दरसाल गौरी गणपती सणाच्या आसपास या पद्धतीने वसई ग्रामीण भागात अशा पद्धतीने मासेमारी केली जाते. साधारण भाद्रपद महिन्यात भरपूर मिळणारे किवाचे मासे हळूहळू कमी होत जाऊन शेतातील पाणी वाहणे चालू असेपर्यंत मिळतात.
सुकवलेल्या माशांनाही चांगला भाव
सध्या ही मासेमारी जोरात चालू असून काही लोक प्रत्यक्ष किवावर जाऊन ताजे मासे खरेदी करतात. परंतु, चालू वर्षी हे मासे मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने विक्री न झालेल्या माशांना कीव मालक हळद व मीठ लावून चुलीवर बांबूची मखरी किंवा ऊतन बनवून सुकवले जात आहेत. हे मासे साधारण आठ महिने टिकतात. या सुकवलेल्या माशांनाही चांगला भाव मिळत असून, पायलीला 500 ते 600 रुपये भाव मिळत आहे. भात लागवडीनंतर व निंदणी काम संपल्यानंतर शेतकर्यांना रोजगाराचे साधन असलेल्या किवाच्या मासेमारीला अच्छे दिन आले आहेत.