वसई – पावसाळ्यामध्ये नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनतो. वसई-विरारमध्ये पावसाळ्यातल्या साथीच्या आजारांबरोबर आता स्वाईन फ्लूनेही प्रवेश केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, स्वाईन फ्लूच्या आजाराने शहरातील तीन नागरिकांचा मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
वसई-विरारमध्ये पावसाने चांगलाच जम बसवला आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्यांचा प्रश्न उद्भवू लागला आहे. यामध्ये आता वसई-विरारमध्ये स्वाईन फ्लूचा शिरकाव झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्वाईन फ्लूने शहरातील तीन नागरिकांचा बळी घेतला आहे. तसेच, स्वाईन फ्लूचे 12 रुग्ण शहरातील विविध रूग्णालयात उपचार घेत असल्याचीही माहिती समोर आली आहे. शहरातील योग्य साफ-सफाई न झाल्यामुळे पावसाळी आजारांबरोबर स्वाईन फ्लूचाही प्रवेश झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वसई-विरार महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून पावसाळ्यापूर्वीची स्वच्छता करण्यात येते. परंतु, रुग्णांची संख्या पाहता, आरोग्य विभागाने केलेले दावे खोटे ठरत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
स्वाईन फ्लूमुळे तीघांचा बळी
पावसाळ्यात आजार मोठ्या प्रमाणावर पसरत असतात, अशावेळी महापालिकेकडून काळजी घेण्याचे आणि परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले जाते. अस्वच्छतेमुळे पावसाळ्यात होणार्या अाजारांची लागण होते. यावेळी डेंग्यू, मलेरियाचे रूग्ण तर अाढळले आहेत. त्याचबरोबर, स्वाईन फ्लूसारखा जीवघेणा आजारानेही शहरात प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांत स्वाईन फ्लूमुळे तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये नालासोपारामधील भीमराम चौधरी, वसई पश्चिम येथे राहणार्या अनिता लोपीस आणि एका बालकाचाही समावेश आहे.