वसतिगृहातील विद्यार्थ्याची आत्महत्या; नातेवाईकांचा एल्गार

0

जळगाव- येथील विद्यापिठाच्या परिसरात असलेल्या आदिवासी मुलांच्या वसतिगृहात राहणार्‍या एका विद्यार्थ्याला जेवणाचे पैसे डीबीटीद्वारे गेल्या तीन महिन्यांपासून मिळत नसल्याने तो तणावात होता. गुरूवारी रात्री जेवणानंतर तो वसतिगृहाच्या गच्चीवर बसलेला होता. शुक्रवारी सकाळी उठल्यानंतर एका विद्यार्थ्याला त्याचा मृतदेह वसतिगृहाशेजारी मिळून आला. दरम्यान, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तरूणाला जीव गमवावा लागल्याचा आरोप करीत विद्यार्थ्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.

उत्तर महाराष्ट्र विद्यापिठातील योगेश अजारिया पावरा, वय-25 हा विद्यार्थी उमविमध्ये एमएसडब्ल्यूच्या पहिल्या वर्षाचे शिक्षण घेत होता. गेल्या तीन महिन्यांपासून त्याचे जेवणाचे (मेस) पैसे डीबीटीद्वारे बँक खात्यात येत नसल्याने तो तणावात होता. गुरूवारी रात्री त्याने विद्यापिठाच्या कॅन्टीनमधून जेवण आणून खाल्ले. जेवणानंतर तो वसतिगृहाच्या गच्चीवर बसलेला होता.

शुक्रवारी सकाळी अजय पावरा हा विद्यार्थी उठल्यानंतर थुंकण्यासाठी वसतिगृहाच्या गॅलरीत गेला. खाली पाहिले असता त्याला योगेशचा मृतदेह खाली पडलेला दिसून आला. त्यानंतर त्याने इतर मित्रांना कळविले. विद्यार्थ्यांचा प्रशासनावर रोष वसतिगृहातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी योगेशच्या मृतदेहाजवळ धाव घेत चादरीने त्याचा मृतदेह झाकाला. जेवणाचे पैसे मिळत नसल्याने योगेशचा बळी गेला, वसतिगृहात मोठ्याप्रमाणावर समस्या असल्याचा सांगत विद्यार्थ्यांनी वसतिगृह अधीक्षक व आदिवासी प्रकल्प अधिकार्‍यांना बोलविण्याची मागणी केली.

आयएफएससी कोड चुकल्याने उशीर
योगेश पावरा या विद्यार्थ्याच्या बँकेचा आयएफएससी कोड चुकीचा असल्याने त्याच्या बँक खात्यात मेसचे पैसे येत नव्हते. अशी माहिती वसतिगृहाच्या अधिक्षकांनी दिली. विद्यार्थ्यांचा संताप वसतिगृहात मोठ्याप्रमाणावर समस्या असून अधीक्षकांना पहिल्यांदाच वसतिगृहात पाहिल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. वसतिगृहात सुरक्षारक्षक असताना मध्यरात्री योगेश गच्चीवर गेलाच कसा? असे विविध आरोप करीत विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. सकाळपासून दुपारपर्यंत योगेशचा मृृतदेह त्याच ठिकाणी पडून होता. सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मृतदेहाजवळ बसून आंदोलन करीत होते.

पोलिसांनी घेतली धाव
घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत सरोदे, पाळधी दूरक्षेत्र पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व कर्मचार्‍यांनी विद्यापिठात धाव घेतली. विद्यार्थ्यांची समजूत घालून परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे काम पोलीस प्रशासन करीत होते.