नंदुरबार । येथील शासकीय वसतीगृहात जेवण चांगले मिळत नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार होती. वारंवार तक्रार देवूनही विद्यार्थ्यांना चांगले जेवण दिले जात नव्हेत. शनिवारी तर एका विद्यार्थ्यांच्या जेवणात मृत पाल आढळून आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत येथील पटेलवाडी भागात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी निवासी वसतीगृह चालविले जाते. या वसतीगृहात ठेकेदारामार्फेत जेवण पुरविले जाते. जेवणात मृत पाल आढळल्याने विद्यार्थ्यांनी जेवण बंद करून वसतीगृह कर्मचार्यांकडे ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी लावून धरली. यावेळी कर्मचार्यांकडून समाधान न झाल्याने विद्यार्थ्यांनी आपला मोर्चा पोलीस स्टेशनकडे वळविला.
पोलीस स्टेशनसमोर ठिय्या
ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी करत विद्यार्थ्यांनी पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन केले. संतप्त विद्यार्थ्यांना पोलीस अधिकार्यांनी समजावून सांगितले असता. या विद्यार्थ्यांनी ठेकेदारावर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या तक्रारीची कोणही दखल घेतली नाही. वसतीगृह कर्मचारी, पोलीस यांनी टोलवाटोलवी केलेली दिसून आली. विद्यार्थी आपल्या चांगले जेवण मिळावे अशी अपेक्षा व्यक्त करत जेवणात मृत पाल आल्याने जीवित हानी झाली असती तर याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला आहे.