बारामती । बारामती बसस्थानक आगारातील चालक वाहकांच्या वसाहतीतील इमारती मोडकळीस आल्या आहेत. तिथे राहणे धोकादायक बनले आहे. त्यामुळे या इमारती रिकाम्या करण्याच्या नोटीस नगरपालिका आणि एसटी महामंडळाने बजावल्या आहेत. याविरोधात एस.टी कामगार संघटना एकवटल्या असून कास्ट्राइब, मनसे, सेना, कामगार संघटना, इंटक या पाचही संघटनांनी ही वसाहत पाडू न देण्याचा निर्धार केला आहे. याबाबत या संघटनांनी आंदोलन करण्याचाही इशारा दिला आहे. जोपर्यंत या कर्मचार्यांची पर्यायी व्यवस्था होईपर्यंत ही इमारत खाली करता येणार नाही तसेच याचठिकाणी कर्मचार्यांसाठी वसाहत बांधण्यात यावी, अशी मागणीही केली जात आहे.
या इमारतीच्या दुरुस्तीसाठी चालक वाहकांकडून दरमहा 500 रुपये घेतले जातात. तसेच मूळ पगारानुसार दहा टक्के घरभाडे भत्ता महामंडळ वजा करून घेत आहे. मात्र, प्रत्यक्षात एक पै देखील देखभाल व दुरुस्तीवर खर्च केली जात नाही. गेली सात वर्ष अशीच परिस्थिती आहे. अत्यंत गैरसोयीच्या या इमारतीत मुलांच्या शिक्षणासाठी राहावे लागत आहे, या पगारात परवडतच नाही म्हणून नाईलाजास्तव इथे राहात आहोत, अशी प्रतिक्रीया येथील कर्मचार्यांनी दिल्या.
या वसाहतीत राहणारे 32 चालक वाहक तणावग्रस्त परिस्थितीत जगत आहेत. डोक्यावर टांगती तलवार घेऊन नोकरीवर जावे लागते. त्यामुळे आमचे मानसिक संतुलन बिघडत आहे, असे यावेळी येथील कर्मचार्यांनी बोलताना सांगितले. या इमारतीच्या वरच्या टाक्यांमध्ये पाणीच चढत नाही. हे काम खर्चीक असल्याकारणाने आम्हाला पाण्यासाठी खाली उतरावे लागते. अशा अनेक संकटांना आम्ही सामोरे जात आहोत. मात्र, याबाबत दुर्लक्षच होत आहे. असेही या चालक वाहकांच्या कुटुंबियांनी सांगितले.
दवाखानाही बंद
चालक वाहकांसाठी एसटी महामंडळाच्यावतीने दवाखान्याची सोय आहे. मात्र, गेली नऊ वर्ष या वसाहतीबाहेर असलेला दवाखाना बंद आहे. आमच्या हक्काचा हा दवाखाना का बंद ठेवण्यात आला आहे. याविषयी कोणीही बोलायला तयार नाही. आम्हाला उपचारासाठी येथून अर्धा किमी अंतरावर पाठविले जाते. येथील डॉक्टर हे बाहेर खासगी प्रॅक्टीस करीत आहेत. त्याठिकाणी आम्हाला पाठविले जाते. याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही या कर्मचार्यांनी केली आहे.
बारामती बस आगारातील चालक वाहक कर्मचार्यांच्या एच1 एच2 या इमारतीच्या दुसर्या तिसर्या मजल्यावरील रिकाम्या भागात वाढलेली सातआठ फुट उंचीची पिंपळाची झाडे आहेत. तसेच या वसाहतीच्या बाहेरच्या बाजूला बंद असलेला दवाखाना दिसत आहे.
दुरुस्तीचा निधी गेला कुठे?
आमच्याकडून देखभाल दुरुस्तीचे घेतलेले लाखो रुपये गेले कुठे? असा सवाल चालक वाहकांनी आगार व्यवस्थापकांना केला आहे. मात्र, या प्रश्नाचे उत्तर दिले जात नाही. विद्युत बिलेही आम्हीच भरतो. तसेच दुरुस्तीचे काम आम्ही स्वखर्चाने करीत असतो तरीही महामंडळ ही इमारत खाली करण्यासाठी का सांगत आहे. हे गौडबंगालच आहे. इमारतीच्या आजूबाजूच्या वरच्या भागात व रिकाम्या भागात पिंपळाची जवळपास सातआठ फुटाची झाडे आहेत. त्यामुळेच इमारतीलाच धोका तयार झाला आहे. दरमहा देखभाल दुरुस्तीसाठी जमा होणारी 16 हजार रुपयांची रक्कम येथे खर्च करावयाची असताना ही रक्कम जाते कुठे हाही प्रश्नच आहे. एस.टी महामंडळ आपल्याच कर्मचार्यांना वार्यावर सोडत आहे ही खेदाची बाब आहे, असे या संघटनांच्या नेत्यांनी याबाबत बोलताना सांगितले.