वसुंधरा सन्मान, वसुंधरा मित्र पुरस्कार प्रदान

0

पिंपरी-चिंचवड : स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आणि वसुंधरा क्लब, पुणे यांच्यावतीने निगडी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सदन येथे आयोजित तीन दिवसीय किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता झाली. यावेळी पुणे येथील जलदिंडीचे प्रवर्तक डॉ. विश्‍वास येवले यांना वसुंधरा सन्मान तर पिंपरी-चिंचवड येथील व्यंकटराव भताने व देहूगाव येथील सोमनाथ मुसुडगे यांना वसुंधरा मित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्राज इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष प्रमोद चौधरी यांच्या हस्ते हा सोहळा झाला. यावेळी वसुंधरा क्लब पुणेचे वीरेंद्र चित्राव, सावरकर मंडळाचे अध्यक्ष विनोद बन्सल, उपाध्यक्ष सदाशिव रिकामे, अनिल खैरै, नरहरी वाघ, श्रीकांत मापारी आदी उपस्थित होते.

पुरस्कार्थींचे मनोगत
यावेळी पुरस्कार्थीनी मनोगत व्यक्त केले. येवले म्हणाले, मी जलदिंडीची सुरुवात केली. जलदिंडी हा नदीशी साधलेला एक संवाद आहे. नदीला आपण आई मानतो. म्हणून तिच्या सौंदर्यात वाढ करताना करत असलेल्या प्रत्येक कामात धन्यता वाटत गेली. नदीशी भावनिक नाते तयार झाले आणि त्यातून जलदिंडीची चळवळ उभी राहिली.

नदीला आई मानून 25 वर्षांपूर्वी मी पवना नदीला ’पवनामाई’ असं नाव दिलं आणि तिचा उत्सव सुरु केला. आज त्या उत्सवाची चळवळ झाली आहे. कानापासून मनापर्यंत निसर्गप्रेम जागविण्यासाठी मिळेल त्या प्रकारे प्रयत्न केले. याकामी अनेकांची साथ मिळाली. आज मी केवळ एक प्रतिनिधी म्हणून इथे उभा आहे. खरं तर हा पुरस्कार त्या सर्वांचा आहे, ज्यांनी निसर्गावर प्रेम केले आहे, अशी कृतज्ञता भताने यांनी व्यक्त केली. मुसुडगे म्हणाले, युवकांचे संघटन करून इंद्रायणी नदीघाटावर ’गुपित बाबा’ची स्थापना करून नदी व नदीघाटावरील स्वच्छतेला आरंभ केला. गुपित बाबाच्या गुपित कृपेने नागरिकांनी देखील स्वच्छता जपण्यास सुरुवात केली. उगमापासून संगमापर्यंत नदी स्वच्छ राहिली पाहिजे, यासाठी विविध सामाजिक संगठना व कंपन्यांनी पुढाकार घ्यायला हवा.
सूत्रसंचालन भास्कर रिकामे यांनी केले. आभार रत्नाकर देव यांनी व्यक्त केले.

स्पर्धांचा निकाल
यावेळी घेण्यात आलेल्या निबंध, पोस्टर आणि घोषवाक्य स्पर्धांचे बक्षीस वितरणही झाले. याचा निकाल असा : निबंध – शालेय गट : जयदीप भालेराव, अथर्व चौधरी, उमा कदम. उत्तेजनार्थ – अनुप्रिया कुंभार, ओंकार काळे. महाविद्यालयीन गट : दिग्विजय सुर्वे, मधुरा धुमाळ, गौरी खोत. उत्तजेनार्थ आरती यादव.
पोस्टर : शालेय गट : वैष्णवी बावणे, दीपक प्रजापती, तेजस कोल्हे. उत्तेजनार्थ – पूजा यादव, ऋतुजा भवर. महाविद्यालयीन गट – सत्यम गुप्ता, रोहित घोडके, आरती खळगे
घोषवाक्य : शालेय गट – तनीष हाजीलाल बागवान, साक्षी कुरकुटे. खुला गट – संपतराव गरजे, प्राजक्ता वडापुरकर, निफाडकर. उत्तेजनार्थ – शुभांगी खताळ.